Sunday, February 14, 2021

मनातल्या प्रेयसीस...

 

प्रिय मंजिरी,

पत्रास कारण की, तुझ्याकडे मोबाईल नाहीये. त्यात  हा एकदोन दिवसांवर आलेला व्हॅलेंटाईन डे..!! अगं, इकडच्या कॉलेजमध्ये आतापासूनच खूप गोंगाट सुरू झालाय. कुणाचं प्लॅनिंग ठरवणं चाललंय. सरप्राईज गिफ्टसाठी काहींच्या कानगोष्टी सुरू झाल्यात पण या सर्वांमध्ये आज मी अगदी एकटा पडलोय म्हणून या इथे कोपऱ्यात बसून...नेहमीप्रमाणे वहीच्या मागच्या पानांवर लिहितोय... आणि बघ ना... आजही माझी वही मागूनच भरत जातेय जास्त.. 

मला माहितेय तुला नव्हतं आवडत ग्रीटिंग्ज, गिफ्ट असं काहीही. म्हणायचीस, प्रेम या सर्व गोष्टींमधून व्यक्त करायचं नसतं रे. प्रेम हे मनात असतं. आपलं कुणीतरी असण्यात असतं आणि महत्त्वाचं म्हणजे प्रेम सामावलेलं असतं कुठल्याही परिस्थितीत एकमेकांना साथ देण्यात…!! 

खरं सांगू, तुझे हे शब्द माझ्या मनावर गोंदले गेलेत. त्यामुळेच आज या इथे... माझं मन लागत नाहीये गं! नुसतं एक सीम कार्ड बदलून दुसरं टाकलं की, या  इथल्या तरुणतरुणींचे मित्रही बदलतात.. आता आता तर अगदी  बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंडही... त्यात आठवणींचा तर प्रश्नच उद्भवत नाही...  आणि कधी अचानक भेटलीच ही मंडळी कुठे तर "स्वीच ऑन"  झाल्याप्रमाणे बऱ्याच वेळानंतर ओळख दाखवतात. जग खूप स्वार्थी  असतं गं... फक्त आपल्यापुरता विचार करणार... हे आता तुझ्या  नसण्यामुळे कळायला लागलंय.. 


 मंजू
अग इथे आता कोणी   हळवंही भेटत नाहीये...   काही होते तसेपण या ना त्या कारणांनी त्यांनाही   वास्तववादी व्हावं लागलंय बाकी करंट विषयावर   बोलणाऱ्यांची संख्या या  न्यूज चॅनलवाल्यांमुळे प्रचंड    वाढलीय... ते कारण   नसताना झेंड्याच्या फंदात    पडतात,  

 ३  इडियट्स पायी कुणी  इडियटपणे आत्महत्या  करतात तर  "शिक्षणाच्या xxx घोऽऽयातील  फुल्यांना आक्षेप घेताना त्यांना   न्युजच्या हेडलाईन मध्ये  हेच वाक्य दाखवताना तिथे "फुल्या"  टाकाव्याशा वाटत नाहीत. अगदीच स्वतःच्या आई बापाला न  विचारपूस करणारेही राज, राहुल, शाहरुखवरही  अगदी वाट्टेल ते  काहीही बोलतात..  

 सॉरी... सॉरी...प्रसंग काय अन् मी   मांडतोय काय..!  ए... मला पक्कं  ठाऊक आहे तू नसशीलच बदललीस. या बिझी नेटवर्कच्या जमान्यात तू  आजही काडेपेटीच्या रिकाम्या  खोक्यांना दोरा बांधून छोट्या भावाशी बोलत असशील... छोट्या- छोट्या  गोष्टींमधून आनंद कसा मिळवायचा हे मी तुला बघून शिकलोय. त्यामुळेच आजही कधी गहिवरून यायला झालं की, मी गच्च डोळे मिटून घेतो.. तुला आठवतो... मग कापडाचा एवढासा तुकडा घेऊन दुकानात त्याला मॅचिंग दोऱ्याचा रीळ शोधताना तू समोर दिसतेस... आणि तू दिसतेस घराच्या मागच्या पडवीत काडी-काडी गोळा करून खोपा बांधणाऱ्या चिऊताईच्या प्रत्येक हालचालीवर सूक्ष्म लक्ष देताना... मंजिरी, आठवतंय.. भिंतीच्या कोपऱ्याने रांगेत ये-जा करणाऱ्या मुंग्यांकडे मला तू ओढून घेऊन जायचीस. तिथेच खाली बसून त्यांच्याकडे निरखून बघत म्हणायचीस, "बघ, एवढ्या धावपळीतही प्रत्येक मुंगी जरा थांबून समोरचीशी काही मनातलं बोलतेय.", मी मान हलवली की, पुढे माझ्यावरचं मोर्चा वळवत मला विचारायचीस, "एऽऽ... काय बरं बोलत असतील त्या? सांग ना तूच..!"- यावर तुला काय उत्तर द्यायला पाहिजे होत त्यावर अजूनही विचार करतोय मी...  पण... पण तुझ्यासारखं निर्मळ शब्दात उत्तर अजून सुचत नाहीये मला...

अजूनही अगदी मनापासून सांगतो तुलाया इथल्या   सेकंदाच्या हिशोबावर   मारल्या जाणाऱ्या गप्पांपेक्षा तुझ्या मौनातही प्रचंड आपलेपणा असायचा बघ...अन् एऽ... कितीही राग आलेला असतानाही स्वतःहून मनापासून बोलणाऱ्या मंजिरीला पुन्हा एकदा बघायचे आहे मला... माहितेय..  खूप   दिवसांपासून चल्लसही   खेळणं झालं नाहीयेये ना तू परत...
पैंजणांचा नाद करत... होऽऽ होऽऽ माहितेय मला...  यावेळी काळे-पांढरे दगड गोळा करायची वेळ माझी आहे ते... तू मात्र पाट आणायचास.. तोच... जुना... एऽऽ... नक्की येशील ना पण नक्की..?
अॅक्चुअली हे एक "नसलेल्या प्रेयसीला असलेल्या प्रियकराने लिहिलेलं पत्र आहे", - असा निष्कर्ष काढून कुणी यावर हसण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.. पण मला खात्री आहे तू आहेस.. इथेच.. माझ्या हृदयातच... आणि जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा... म्हणजे अगदी आता... या मध्यरात्रीच्या क्षणी ही.. तू मला ही वही उघडायला लावशील नि माझ्याच डोळ्यांनी हे सर्व वाचून माझ्याच गालांवरून मनसोक्त ओघळूनही जाशील...नेहमीप्रमाणे... अगदी माझ्याही नकळत...
    अमोल जगताप