Saturday, October 3, 2020

कोरोना, कंगना आणि काळजातले काही...

 

माय डियर देशा..!!

गुड नाईट.. अरे हो, बरोबरच ऐकतोयस तू.. हो ना बाबा गुड नाईटच बोललोय..!

हो.. हो.. ठाऊक आहे तू झोपणार नाहीयेस पण आम्ही तर झोपतोय ना! खरंतर 'झोपलेलो'चं आहोत आम्ही. मग तिकडे काहीही होऊ दे तुझं आणि तुझ्यातल्या त्या 'आमच्यांचं'..!!

छ्या.. एवढं काय टेंशन घेतोयस तुही राव..  काय म्हणतो?  गेल्या चोवीस तासात 95 हजार पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झालीये.. इट्स ओके रे. तू कशाला त्यांची काळजी करत बसतो बाबा. अरे या परिस्थितीतही  ' बूम बूम ' करत विदाऊट मास्क ट्रिपल सीट जाणारे तरुण बघशील तर तुझ्यातही थोडी 'एनर्जी' संचारेल बघ.. अरे एवढे 'शेर-दिल' नागरिक तुला भेटलेत, त्यांचा तुला खरं तर अभिमान वाटायला हवा आणि तू बाबा उगाच त्यांची काळजी करत बसतोस.. बी फ्रेश देशा.. "मानसिकतेचा आंतरिक ' इम्युनिटी' वर फरक पडतो.." परवा कुठल्यातरी टाम-टूम व्हाट्सअप ग्रुप ला वाचलं मी हे..

काय म्हणतो.. कोरोनामुळे तासाभरात सरासरी 48 लोक आपलं मौल्यवान जीवन गमवायला लागलेत?

काय राव तू पण? तिकडे त्या रिया - कंगनाच काय होतंय त्यात इंटरेस्ट आला असतानाच तू अशा 'सॅड' न्यूज देतोस.. अरे! न्यूज हवी कशी... इंटरेस्टिंग कम ब्रेकिंग..!! " क्या काला जादू करती थी रिया चक्रवर्ती?" बघ तुलाही इंटरेस्ट आला नसतं हेडिंग ऐकून. अरे, यासाठी दोन दिवस न्युज चॅनल्स समोर जाऊन बसलो होतो आम्ही,  काला जादु बद्दल तर काही समजलं नाही पण कोणत्यातरी चैनल चा टीआरपी मात्र वाढला म्हणे! असो आपल्याला काय घेणं त्याच्याशी.. 'जस्टिस फॉर सुशांत' महत्त्वाचं!

काय म्हणतो.. रेवती बच्छाव ला 'जस्टीस' कसा मिळणार?

मिळेल की.. पण एक्सक्युज मी कोण रे ही रेवती बच्छाव..?? tweet वगैरे केले का तिने एवढ्यात काही..?

देशा सॉरी बर का, बरं तू आठवण करून दिलीस.. रेवती बच्छाव..  नाशिकची ती.. आई-वडील मजुरी करतात; त्यात घरात एकच मोबाईल आणि भावंडे तीन! आता तू सांग ना एवढं महत्त्वाचं बारावीच्या वर्ष आणि अभ्यास ऑनलाईन करणं शक्य आहे का एकाच मोबाईलवर.. तिघांना!

अभ्यास करणे अपूर्ण राहील या भीतीने आत्महत्या केली म्हणे तिने.. सो सॅड.. पण तिने साधं tweet केलं असतं तर प्रश्न सुटला असता.. खरं ना रे... अरे, एका tweet वर कंगनाला Y+ सुरक्षा व्यवस्था मिळाली.. मग एक साधा मोबाईल नसता का दिला सरकारने रेवतीलाही.. माहिती नसेल तुलाही की आतापर्यंत फक्त 15 लोकांना ही Y+ सुरक्षा मिळते आहे. नक्की, भविष्यात आता कंगनावरही सिनेमा निघेल बघ, तोही लवकरच... रेवतीबद्दल बोलूया पुन्हा कधी तरी...

उत्तर प्रदेश, हाथरस मध्ये घडलेल्या घटनेबद्दल बघ, काही पोलिस अधिकाऱ्यांचं निलंबन किती तडकाफडकी करून टाकलंय.. पटापट 'जस्टिस' मिळतोय ना..!!

काय म्हणतोस.. "खरंच दोष त्यांचाच होता का? त्यांना ऑर्डर सोडणारे मोकाट कसे? त्यांच्यावर नको का कार्यवाही?"

खूप प्रश्न विचारतोस बाबा तूही... एवढे प्रश्न तर आम्हालाही पडत नाही सहसा... झालं त्यात, तेवढ्यात.. समाधान मानायची सवय पडून गेलीय आम्हाला आता.. तेही विथाऊट अर्गुमेंट.. असेही अर्गुमेंट करणाऱ्यांचे हाल पाहिले आहेत आम्ही... तेव्हा शांत हो तूही.. कशाला बीपी वाढवून घ्यायचा या कोरोना काळात... उगाच अजुन रिस्क..!!!

आपल मस्त आयपीएल च्या मॅचेस बघायच्या.. या बलात्कार, अत्याचार, भ्रष्टाचारी बातम्या बघण्यापेक्षा... तुला सांगतो त्या दिवशी त्या राहुल तेवठीयाने काय सिक्स मारले... रात्रभर त्याच्या घरच्यांना लोक फोन करून अभिनंदन करत होते.. वैतागून शेवटी स्विच ऑफ केला त्यांनी मोबाईल...

काय म्हणतो... मला कोणी सांगितलं हे?

अरे न्यूज ला आले होते की हे.. हो हो... सद्ध्या या अशाच बातम्या खूप व्हायरल होऊन जातात हं...

काय म्हणतो जुलै-ऑगस्ट महिन्यात सॅलरी क्लासमधल्या 81 हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्यात...?

नाही बाबा, असं तर काही वाचण्यात, ऐकण्यात आल नाही एवढ्यात.. हा.. पण तू म्हणतो त्यात पॉइंट असू शकतो.. कारण बरेच मित्रमंडळी व्हॉटसअप ग्रुप वर बायोडाटा पाठवत असता बरका हल्ली...

पण तुला कस समजलं रे हे सर्व.. तुलाही कुणी केलाय का फॉरवर्ड बायोडाटा..? बाय द वे तुझा व्हॉट्सअँप नंबर काय आहे रे ?

काय..!! तुला व्हॉट्सअँप ची गरज नसते लोकांशी कॉन्टॅक्ट मध्ये राहायला...? ग्रेटच आहेस मग तू तर...

बरं काय बोलत होतास मघाशी तू... ते नोकऱ्या गेल्या त्याबद्दल...?

दोन महिन्यात 81 हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्यात... कसं सुरू असेल त्यांचं घर? बँकवाले लोन साठी काय काय हाल करत असतील त्यांचे? त्यांच्याकडे मुलांना ऍडमिशन घ्यायला पैसे असतील? भाड्याने राहणारे कसं करत असतील आता? किती दिवस असं जगू शकणार ते?

देशा, तू पण ना फारचं इमोशनल होतोय रे.. अरे लोकांची कुठे काळजी करत बसतो तू.. स्वतःची काळजी कर, ते बारक्या डोळ्यांचे चायनीज लोक कधीही वार करतील अशी परिस्थिती आहे..

त्यात तुझं आपलं सारखं चाललंय की 81 हजार लोकांच्या नोकऱ्या केल्या.. काहीही सांगतो राव तुही.. हे शक्य नसेलच..  इथे रोज न्यूज बघतो आम्ही.. सुशांत, रिया, कंगना, बीएमसी, ड्रग्स या व्यतिरिक्त दुसरं खरच नाही रे काही असं एवढं 'सिरीयसं'..

काय म्हणतो आहेस, बाकी जी-20 देशांमध्ये तुझी परिस्थिती अतिशय संवेदनशील आहे होय कोरोना संक्रमणबाबत आणि अर्थव्यवस्थेचे ही हाल झालेत असं म्हणतोस..

आता तूच म्हणतो आहेस तर असं असेलही, तरीपण मीही जरा निवांत वेळ मिळाला की क्रॉस चेक करून बघेल पण त्याआधी ऐैक ना, एक अंदर की बात सांगतो...

आधी आधी आपल्याकडे फक्त नोकरी लागावी म्हणून वशिला लागायचा.. आता हॉस्पिटल ला बेड मिळावा म्हणूनही वशिला लावावा लागतोय हं.. अरे, एवढंच नाही तर औषधांसाठीही आणि आता आता तर अंत्यसंस्कारासाठीही वशिला नाही लावला तर दोन दोन दिवस मृतदेह पडून राहतोय बाबा तसाच.. आम्ही तर एका नगरसेवकाकडे सेटिंग करून ठेवली आधीच.. कुणास ठाऊक कधी गरज पडेल?

काय म्हणतोस, सर्वसामान्य नागरिकांनी करायचं काय मग? त्यांनी जगायचं कसं? हॉस्पिटल्स, बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन त्यांना कसा मिळेल?

देशा, पुन्हा तेच..! फारच सिरीयस होतं राहतो तुही, जाऊ दे ना.. तुला नसेल झोप येत कदाचित पण मला येतेय... बाय द वे गुड नाईट...!!

- अमोल जगताप




Saturday, September 5, 2020

एक्सक्युज मी सर...

क्सक्युज मी सर, नाही काही डिफिकल्टी नाहीये सर... वर्गात एवढं मनापासून शिकवता तुम्ही.. सगळ्या डिफिकल्टीज तिथेच क्लिअरही करून घेतात मग आता कसली अडचण राहणार.. ऍक्च्युली थँक् यू सर, आम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहण्याजोग 'मोठ्ठं' केलं त्याबद्दल.. आजच्या जगात जगण्यासाठी 'परफेक्ट' केलंत त्याबद्दल.. पण सर थोडी अजून अपेक्षा आहे तुमच्याकडून..

सर, कुटुंबापासून दुरावत चाललोय आम्ही.. संस्कृतीही विसरत चाललो आहे, असं वाटत नाही तुम्हाला..

खरं सांगू सर, छोट्या छोट्या गोष्टींचीही लाज वाटायला लागलीय आम्हाला आता... ज्या बापाने आभाळाएवढे कष्ट उपसून आम्हाला एवढे मोठे केले त्याचा मोठेपणा कळेनासा झालाय बघा सर, त्याचे विचारही आता आता बुरसट वाटायला लागलेत आम्हाला.. 

सर, तुम्ही मध्यस्थी करायला हवी आज.. पुस्तकाबाहेरच्या जगातील मुल्लेही उदाहरणांसह स्पष्टीकरण देऊन समजावून सांगायला हवीत आम्हाला. सर, खरंतर आता पाठीवर हात ठेवून भलेही शाबासकी देऊ नका, पण खांद्यावर हात ठेवून दोन गोष्टी समजाऊन सांगत चला आम्हाला सर. तुम्हीच समजावून सांगू शकता आम्हाला आणि तुम्ही समजावलेलच आम्हाला पटू शकत सर..!! 


 खरं सांगू सर, आई-बापापेक्षा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आम्हाला जास्त जवळचे वाटायला लागलेत सद्ध्या.. मोबाईल तर अन्न-वस्त्र-निवारा यापेक्षाही महत्त्वाचा होऊन बसला आहे सर आमच्या या आयुष्यात आणि रागावू नका सर पण पुडी तोंडात टाकल्याशिवाय कामात मनही लागत नाही आता. सर सांगा ना एकदा अगदी मनमोकळं तुम्ही कसे घडले ते... मोबाईल आणि बाईक शिवाय... जीन्स आणि मल्टिप्लेक्स शिवाय..

 एखाद्या
लेक्चरला आणू नका पुस्तक, खडू आणि डस्टरही.. फक्त तुम्ही या जुन्या आठवणींची शिदोरी घेऊन.. आणि भरभरून सांगा तुमच्या जुन्या दिवसांबद्दल अगदी आईने मारलेल्या धपाट्यापासून ते तळपायात भरलेल्या बाभळीच्या निबर काट्यांपर्यंत.. सांगा सगळं सर.. अगदी डिटेल्समध्ये.. कारण सर आज आमच्या पायात कधी बाभळीचे काटे तर अजिबात भरत नाहीत पण तरीही नुसता स्लीपर काढून अंगणात गेलो तरीही खडे टोचून तळपायाला असंख्य वेदना होतात सर.. का होत असेल सर असं?

सर, वावरात पाणी भरताना.. वाफ्यात, चिखलात उभ राहून फावड्याने पाणी वळवतांना 'एक्झॅक्टली' कसं वाटायचं सर?  आणि चुकून कधी ते फावड तुमच्या पायाला लागलं होतं सर? मग हो.. हायड्रोजन पेरॉक्साइड, बँडेज असायचं का तुमच्याकडे?  आज सगळं सांगा सर.. सायकलच्या कॅरेजला अडकवून पाण्याचे हंडे वाहून आणायचे ना तुम्हीही? येताना चुकून हंडा पडला तर तुमचे वडील तुम्हाला मारायचे ना? सांगा सर आम्हालाही...  कारण आता आम्हाला जेवताना साधा ग्लास भरून घ्यायला पण कमीपणा वाटतो, मार खायचं तर लांबची गोष्ट.. अहो साधं कुणी ' रागावल तरी आम्ही आत्महत्येचा विचार करतो.. कधी कधी विचार अमलात आणतोही...

कॉलेजच्या कॅन्टीन प्रमाणे घरातही पाय पसरून खायची सवय लागून चाललीय आम्हाला.. आईला जीव लावायचा तर सोडा पण तिची साधी कीवही येईनाशी झालीय आमच्यातल्या काहींना.. आता बाईक शिवाय कॉलेज कॅम्पस मध्ये एंट्री करताना कुठेतरी कमीपणा सारखं 'फिल' होत आहे सर.. सायकल तर शाळेबरोबरच सुटली.. त्यानंतर कित्येकदा ग्रुपमधल्या मायकल सोबत बाटलीही फुटली सर.. पण ते काही असो.. या शहरात आल्यावर बरं झालं मित्रही चांगले भेटले.. अगदी जिगरी.. कधी कमी-जास्त झाली तरी घरापर्यंत सोडायला येणारे.. आणि बघा ना तरीही आईवडील त्यांनाच शिव्या देत बसता नुसते.. सॉरी सर.. विषय भरकटतो आहे जरा..

सर, वर्गात एकदा मनमोकळ सांगून टाका की, सायकलच्या दांडीला टॉवेल बांधून छोट्या भावंडांना तुम्ही गावभर फिरून आणायचे ते आणि हे पण सांगा मध्ये सायकलची चैन उतरली तर कशी तारांबळ उडायची तुमची... शिटाखाली ठेवलेला फडकं, रस्त्याने सायकलवर जाताना खडम-खडम करत येणारा स्टॅन्डचा आवाज आणि मग मडगार्डवर लिहिलेलं 'मेरा भारत महान'चे रबर.. सगळं सांगून टाका अगदी डिटेल मध्ये...!

सर, शिकवत जा इंटिग्रेशन, हिस्टरी, केमिकल रिएक्शन, इंटरनेट आणि नासा ने लावलेले शोध सांगत जा.. पण जरा वेळ काढून आजी-आजोबांशी बोलता  का रे भरभरून हेही विचारात जा कधी. सर, असेल ना अजून एखादी आकाशगंगा, तेथेही असेल जीवसृष्टी अन कदाचित मंगळावर पाणी ही असेल.. पण माझ्या आईच्या डोळ्यातील पाण्याचे कारण शास्त्रीय थोडीच असणार सर... नासा थोडी त्याबद्दल काही भाष्य करू शकणार.. आजही घरी जायला जरा उशीर झाला तरीही किलकिले होतात हो तिचे डोळे.. तोंडावर हात फिरवून म्हणते 'फार रहदारी असते रे, जीव लागून राहतो' - सर अशा वेळी तिची समजूत कशी काढायची तेवढा सांगा फक्त .. बस्स....

अमोल जगताप   






REST IN PEACE




Saturday, July 4, 2020

मला आवडलेलं.. खास तुमच्यासाठी निवडलेलं…




...काही माणसं असतातच मुळात महत्त्वाकांक्षी.. 'काय नाहीये आपल्याकडे' हे सांगत रडत बसणे नाही पटत त्यांना.. 'पोलादी मुठी'ची ही अशी माणसे असतात वावरत आपल्याच आसपास.. जसा माझा मित्र किशोर... किशोरला मी शालेय जीवनापासून ओळखतो.. शेजारीच एका घराचं बांधकाम सुरू झालं तिथे कामासाठी एक पत्र्याच शेडं टाकून एक कुटुंब रहायला आलं.. त्या कुटुंबातला मोठा मुलगा म्हणजे किशोर.. आम्ही ग्राउंडवर क्रिकेट खेळत असताना बांधकामाच्या विटा वाहताना, भितींना पाणी मारताना तो नेहमी दिसायचा.. दिवसभर काम अन् सायंकाळी बाहेर बसून अभ्यास.. लाईटचीही सोय नव्हती नेमकी तेव्हा.. हिवाळ्यात तर अंधारही लवकर पडायचा.. त्याची पंचाईत व्हायची. मग  शेजारच्या घराच्या पोर्चच्या बल्बखाली तो कित्येकदा लिहित-वाचत बसायचा.. पुढे पुढे घराचं बांधकाम आटोपलं.. दुसरं कामही मिळेना जवळपास, मग ऊस गुऱ्हाळाचा गाडा सुरू केला त्याच्या वडिलांनी.. किशोरही लाजता गल्लीबोळातून मित्रांसमोर तो गाडा ढकलत वडिलांसोबत रस काढून विकू लागला... दिवसभर दमुनही त्याच्या रात्रीच्या अभ्यासात मात्र खंड नव्हता.. दरम्यान किशोरच्या बहिणीचं लग्न झालं.. कुटुंबाचागाडावडिलांसोबत ओढत; अभ्यासाचाकासराही त्याने कधी हातून सुटू दिला नाहीकिशोरबद्दल एक गोष्ट विशेषपणे नमूद करावीशी वाटते कि, आयुष्य एवढं खडतर सुरु असतानाही कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाता.. कुठल्याही गोष्टीसाठी कुढत बसता तो फक्त आणि फक्त लढत गेला.. आज त्याने त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा सर केलाय.. MA, M.Phil, SET करून तो एका 'विद्यार्थ्याचा' आता 'सर' झालाय... त्याच्या ह्या लढवय्या स्वभावाचं वर्णन करायचं झालं तर खालच्या ओळी अगदी चपखल बसतात...

व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो
मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची !
पैज जे घेती नभाशी आणि धडका डोंगराशी
रक्त ज्यांचे तप्त आहे, फक्त त्यांना हक्क आहे
श्वास येथे घ्यावयाचा ! आग पाण्या लावण्याचा
घाव ज्यांचा भाव आहे, लोह ज्यांचा देव आहे
माती हो विभुती जयांची, ही धरा दासी तयांची ..!!!



मला आवडलेलं.. खास तुमच्यासाठी निवडलेलं मध्ये.. आज त्याचीच कविता... तुमच्याच मनात असलेल्या 'किशोर'साठी... 



माय आणि मराठी

गुरूजी तसा मी इंग्रजीचा विद्यार्थी
पण माझी माय आणि मराठी या दोघींसाठी,
माझ्या पोटात कळ आणि मनात कळकळ आहे..
काल वर्गात शिकवलेली ‘ट्रेजडी’ आणि
मित्रांनी ग्राउंड वर केलेली ‘कॉमेडी
असा दोन्हींचा घोटाळा डोक्यात घेऊन घरी गेलो..
तर माय माझी जात्यावर दळून गाणं गात होती
तिचं गाणं - ऐकून जणू काळजाचं पाणी झालं
दप्तराचं ओझं खाली टाकत मी तिच्याजवळ जात म्हणालो-
आई तुझ्या गाण्यानं काळजाचं पाणी झालं बघ
जात्यावरच्या पिठानं माखलेला हाथ तोंडावरनं फिरवत माय म्हणाली
तु माह्या पोटचा गोळायस म्हणून तुला सांगते,  काळजातुन  गायलं का  काळजाला भिडतंय  बघ
तु माह्या पोटचा गोळायस म्हणून पुन्हा तुला सांगते,
माणसाच्या माणुसकीला जसा काही पइलाच सुरुंग लागलांय बघ
जर का माणसाची माणुसकी शिल्लक असती तर तुक्याची गाथा इंद्रायणीच्या पाण्यात बुडवली नसती
येशुला हत्तीच्या पायाखाली चिरडलं नसतं
पोरा तु माह्या पोटचा गोळायस म्हणुन पुन्हा तुला सांगते
इंग्रजाच्या इंग्रजीतले चार पुस्तकं शिकुन साता समुद्रापल्याड गेलास तर माझ्या माय मराठीला इसरु नगंस
भावनेच्या भरात गाईलेल्या गाण्यानं आईच्या डोळ्यातुन आसवं ओघळत होती
तिच्या ओघळणाऱ्या आसवांना पुसत
मी म्हणालो आई मलाही वाटलं गं
या माय मराठीचे शहाणपण माणसांना ओरडून सांगावं.
पण शहाणपण जपणारी माणसं कुठयत..
आई मलाही वाटतं गं..
खूप खूप बोलावं.. पण बोलकी माणसं भेटत नाहीत.
तेव्हा मला जे बोलायचे ते कागदांशी बोलतो
तसेही माणसांशी बोलायचे दिस राहिले नाहीत आता..
आई,  मला त्या माणसांबद्दल बोलायचे आहे ज्याच्यासाठी जन्मल्यावर  बारा आणि मेल्यावर चौदा दिवसाचा इटाळ पाळला जातो..
आई मला त्या माणसाबद्दल बोलायचे आहेजो जन्मभर जळल्यावरही त्याला मेल्यावर पण जाळलं जातं..
आईमला त्या मातीबद्दल बोलायचे आहे
जिथे पुरलेलं नाही पण पेरलेलं उगवतंय..
माझ्या बोलण्यानं माईच्या डोळ्यांतून पुन्हा एकदा आसव ओघळली..
अन जात्यावरच्या पीठाने माखलेला हात तोंडावरनं फिरवत माय म्हणाली
पोरा तुझ्या ईचारांचा कळस गगनाला जावा..
म्हणून इटेवरच्या ईठठलाला साकडं घालील..’
एरव्ही दळून दळून तोंडाला फेस आल्यावर
इटेवरच्या ईठठलाला शिव्या घालणारी हीचं ती माझी माय..
माझ्या ईचारांचा कळस गगनाला जावा अन् त्याला गंध मातीचा यावा   म्हणून साकडं घालू लागली..
गुरूजी अशी आहे माझी माय आणि मराठी..
म्हणून तिच्यासाठी माझ्या पोटात कळ नि मनात कळकळ आहे..

-     -   किशोर कुदळे