Sunday, April 26, 2020

मला आवडलेलं... खास तुमच्यासाठी निवडलेलं...


इतिहासाबद्दल नुसती आवडचं नाहीतर प्रचंड अभ्यास... तसेच सिनेमाबद्दल... त्यातील विशिष्ट सीन्सबद्दल प्रचंड माहिती.. असं सगळं प्रचंड प्रमाणात असलेला हा इंजिनिअर... विषय कुठलाही असुदे.. हातात घेतला तर त्याबद्दल झपाटून माहिती मिळवणार.. याला कधीही भेटा, हा कोणत्यातरी महत्वाच्या विषयाला हात घालणारचं.. समोर कोण आहे हे न बघता मनातली खरी प्रतिक्रिया देणारा हा खरा रत्न.. सौरभ रत्नपारखी...! 

इन दिनों दिल मेरा......


आज सकाळी लवकरच जाग आली. अलार्मच्या कर्णकर्कश आवाजाने की बाहेर पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या आवाजाने हे मात्र सांगता येणार नाही. मोठ्या अनिच्छेने गजर बंद करून पुन्हा झोपलो. क्षणभरात लक्षात आले आज तर जॉईनिंग डेट! जॉबचा पहिला दिवस..! पाल झटकावी तसे पांघरूण झटकून उठलो. अवघ्या तासाभरात आवरून तयार झालो आणि मग परीक्षेला जावे अशा आवेशात सर्वांच्या पाया पडून कामाला निघालोरिमझिम पाऊस चालूच होता. दरवर्षीचे त्याचे आगमन काही फारसे वेगळे नसते पण आज का कोण जाणे थोडासा फरक जाणवत होता.
उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरू व्हायची तेव्हा . असाच पाऊस पडत असायचा आणि शाळेत गेल्यावर पहिला निबंध असायचामाझा आवडता ऋतू!’ पहिलीपासून दहावीपर्यंतची सुरुवात थोड्या फार फरकाने वेगळी नसायची. रेनकोट आणि बालभारतीच्या पुस्तकांचा वास अजूनही आठवतोय. पायातल्या जाडजूड गमबुटांनी साचलेल्या पाण्यात मारलेल्या उड्यासुध्दा आठवतात. तेवढ्यात शेजारून एक बाईकस्वार भरघाव वेगाने गेला. जाता जाता पॅण्टवर पाण्याचे नक्षीकाम करून गेला. त्याच्यावरमूर्खम्हणून ओरडण्याआधीच दिसेनासा झाला. माझी विचारांची तंद्री भंगली. कंपनीची बस स्टॉपवर वाट बघत उभी असेल या विचाराने मी झपझप चालू लागलो. रस्त्याच्या बाजूलाच समीरचे घर होते. अवघ्या दोन महिन्यापूर्वीच आमचे कॉलेज जीवन संपले. दररोज आम्ही एकत्र कॉलेजला जायचो. त्याच्या बाईकवर बसलो की जय-वीरू वाटायचो. त्याला सवयीप्रमाणे हाक मारण्याची खूप इच्छा झाली; पण आठवले की, मागच्या महिन्यात तोसुध्दा कामाला लागला. आता नाईट शिफ्ट करून आला असेल तर गाढ झोपेत असेल. माझी नेहमीची घाई पाहन म्हणाला असता, ‘रिलॅक्स यार. पहिले लेक्चर देशपांडे सरांचे आहे. बंक मारला तरी चालेल. सकाळी सकाळी कुठे बोअर व्हायला चाललास.’
स्टॉपवर पोहोचलो तेव्हा बस निघण्याच्या तयारीत होती. कंपनीचे जुने कर्मचारी माझ्याकडे कुतूहलाने पाहत होते. पावसाचे भुरभुरते थेंब निथळत मी एका खिडकीपाशी जाऊन बसलो. आणि मग पावसासकट बसनेही जोर पकडला. माझ्या शेजारचे एक ज्येष्ठ कर्मचारी हातातला अर्धवट ओलाटाइम्सवाचण्यात गढून गेले होते. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारण्याचा प्रश्नच नव्हता. मान तिरपी करून हेडलाईन्स वाचण्याचा प्रयत्न केला; पण सकाळी सकाळी कॉस्ट कटिंग, रिसेशन, टेररिस्ट, लोड शेडिंगच्या बातम्या दिसल्याने तो नाद सोडून दिला. खिडकी उघडून मृदगंध घेण्याचा प्रयत्न केला पण हे डांबरी रस्ते थोडीच साथ देणार होते. पावसाचे टपोरे थेंब टप्पा खाऊन टाईम्सच्या रोखाने निघाल्याने शेजारच्याचा त्रासिक चेहरा पाहण्याआधीच मी खिडकी बंद केली. यंत्राच्या संगतीत दिवस काढणाऱ्या या कर्मचाऱ्यांना मृदगंध, हिरवळ. इंद्रधनुष्य, दवबिंदू पाहण्यात मुळीच इंटरेस्ट नव्हता. मग मी सुध्दा फेरीवाल्यांची धावपळ निर्विकारपणे पाहू लागलो.
बस कंपनीच्या आवारात आल्यानंतर ही सर्व जण यंत्रवत आपापल्या विभागात निघून गेले आणि माझ्यासारख्या नवोदितांची गाठ पडली आपल्या नव्या बॉसशी. बॉसचा चेहरा पाहिल्यावर मला पुन्हा देशपांडे सरांची आठवण झाली. सेम टू सेम चष्मा आणि हेअर स्टाईल! मोठ्या प्रयासाने हसू आवरले. आमच्या दहा-बारा जणांच्या ग्रुपसमोर बॉसने एक प्रदीर्घ भाषण ठोकले. कंपनीच्या मिशन- व्हिजनचा आराखडा आमच्यासमोर उतरविला.
समीर इथे असता तर म्हणाला असता चांगला पाऊस पडतो आहे. हे लेक्चर झाल्यावर फुटबॉल खेळायला जाऊ. माझ्या डोळ्यांसमोर फुटबॉलची मॅच तरळली.
समीरचे महात्मानगर म्हणजे मँचेस्टर युनायटेड आणि आमचे रविवार पेठ म्हणजे रिअर माद्रिद यांच्यामध्ये जोरदार मुकाबला चालू आहे. माझ्या पायाशी घुटमळणारा फुटबॉल लाथाडत मी गोलपोस्टच्या रोखाने निघालो आहे. मुसळधार पावसाची आणि पायाखालच्या चिखलाची तमा बाळगता मी सुसाट धावतो आहे. ओल्याचिंब सम रचा डिफेन्ड मोडून मी राहुलकडे पास देतो आहे. राहुल नितीनकडे आणि नितीनचा पुन्हा माझ्याकडे पास. आणि या एका जोरदार किकने फुटबॉल उडतो आहे. गोलकिपर प्रशांतच्या डोक्यावरून थेट गोलपोस्टमध्ये! गोल...!!!
आम्हाला आमचे नवे केबिन मिळाले. त्याच्या नव्या कोऱ्या फर्निचरच्या टपेंटाईन वासाला - बालभारतीच्या वासाची सर येणार नव्हती. मग आजचा दिवस असाच कामाचे स्वरूप समजावून घेण्यात घालविला. खिडकीच्या काचांवरून साचलेल्या बिंदूमध्ये निरर्थक आकृत्या काढण्यात संध्याकाळ कधी झाली समजलेच नाही... संध्याकाळी त्याच बसने सर्व जण यंत्रवत घरी परतले. मी इयरफोन लावून मोबाईलमधली गाणी ऐकण्यातच प्रवास संपवला. विशेषत: मेट्रोचे गाणे आज पुन्हा ऐकावेसे वाटत होते.

बेरंगसी है बड़ी जिंदगी कुछ रंग तो भरू

मै अपनी तनहाई के वास्ते कुछ ऐसा करू

जब मिले थोडी फुरसत तू भी करले मोहब्बत

है तुझे भी इजाजत करले तू भी मोहब्बत

घरी आल्यावर कंपनीचा युनिफॉर्म उतरल्यावर एखादे ओझे उतरविण्याचा भास झाला. पाऊस अजूनही अविरत चालू होता. तेवढ्यात भाचा धावत येऊन म्हणाला, ‘कागदाची होडी बनवून द्या ना.’ हातातला गरम चहाचा कप बाजूला सारत मी कागदाची घडी घातली. मग स्वतशीच हसत चूक सुधारली. मी होडी नाही विमाम बनवत होतो. पाण्याच्या वाहत्या ओघात ती कागदाची होडी वाहू लागली. आणि कोपऱ्यावर कुठेतरी दिसेनाशी झाली. त्या होडीच्या कागदावर टेररिस्ट, लोडशेडिंग, रिसेशनच्या बातम्या वाहताना मला दिसल्या आणि ते दृश्य पाहत मी तसाच उभा राहिलो. हातातला चहा संपेपर्यंत.

सौरभ रत्नपारखी

2 comments:

  1. धन्यवाद !! हा माझाही आवडता लेख होता.
    Missing Tarun Days

    ReplyDelete