पुस्तकं बोलू लागतात, त्यांचं अंत:करण उलगडत जातं आपल्याशी व्यक्त
होताना... फक्त पुस्तकं नाही, त्यातले लेखक अन पात्रही हजारदा व्यक्त होत
जातात त्यातून, म्हणूनच ‘युगंधर’ वाचताना आजही श्रीकृष्ण भेटतो आपल्याला, ‘मृत्युंजय’ मधून कर्ण आणि ‘ययाती’ मधून यती-ययाती
भेटल्याशिवाय राहत नाही! अजून काय हवंय या निर्जीव वाटणाऱ्या पुस्तकांकडून ?
पुस्तकाकडून मस्तकाकडे….
‘घरात बसून वैतागलेय, संचारबंदीच्या काळात काही वाचायला मिळेल का?’
– परवा रात्री कल्याणीने व्हाट्सअप मेसेज केला.
मी तत्काळ माझ्या टेबलवर असलेल्या पुस्तकांतील ४/५ पुस्तकांचे कव्हर फोटोज तिला सेंड केले. अन सांगितलं - ‘त्यातून जे हवे ते घेऊन जा.’ आज सकाळीच त्यातले तीन पुस्तकं ती घेवून गेली. ‘लॉकडाऊन’
सुरु झालं तेव्हा ऐश्वर्यानेही वाचून झालेली दोन पुस्तकं परत केली आणि नवीन काही वाचायला नेली. अर्थात हे शेजारी होते म्हणून.
नाहीतर लॉकडाऊनच्या काळात शक्य नव्हतं. पण छान वाटतं पुस्तकांची,
विचारांची अशी देवाण-घेवाण होत असताना.
‘पुस्तकाकडून मस्तकाकडे..’ हा प्रवास
‘कोरोना संचारबंदी’च्या काळात चांगला चालू झालाय.
संचारबंदी असल्याने एका जागी बसण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय माणसाकडे उरला नाहीय;
त्यामुळे टिव्ही सिरीअल, न्यूज आणि पुस्तकं असा टाईम सॉंर्टआउट केलाय बऱ्याच मंडळींनी. त्यात टेलिव्हिजन आपण नेहमीच बघतो, पण त्याचाही कंटाळा आल्यानंतर विरंगुळा म्हणून का होईना अनेकजण पुस्तकं वाचू लागलीत.
हे छान नियोजन आहे. तसंही इतकं निवांतपण कधी मिळत होतं या धावत्या प्रवासात !
कॉलेज संपल्यानंतर दैनिक सार्वमतला उपसंपादक म्हणून नोकरीला लागलो त्या पहिल्याच पगारात मी खूप सारी पुस्तकं खरेदी केली होती. त्यात वपू माझे आवडते लेखक असल्याने त्यांचीच जास्त होती. तेव्हापासून माझ्या लायब्ररीत एक एक पुस्तक वाढत गेलं.
नंतर नोकरीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी प्रवास झाले. क्षेत्र बदलत गेले तसे भोवतालचे माणसं आणि अनुभवसुद्धा. पण त्या प्रवासातही जमेल तसं एखादं का होईना पुस्तक मी घेत राहिलो. कित्येक पुस्तकं मला खरेदी करणं शक्य नव्हतं तर इतर मित्रांकडून वाचायला घ्यायचो. ही देवाण-घेवाण मस्त सुरुय कधीपासून...
कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक असताना माझ्याकडे कॉलेजच्या लायब्ररीतली २८ पुस्तकं होती. विशेष म्हणजे त्यातलं एकच पुस्तक वनस्पतीशास्राचं होतं. बाकी सगळे अवांतर,
म्हणजे कथा, कादंबऱ्या होत्या. मी वनस्पतीशास्र शिकवत असलो तरीही कविता हे माझं पाहिलं प्रेम होतं म्हणून ! मी आजपर्यंत नोकरी केलेल्या ठिकाणांपैकी सगळ्यांत समृध्द ग्रंथालय होतं ते दादा पाटील कॉलेजचंच, कारण माझ्या दृष्टीने अनेक दुर्मिळ आणि सहज न भेटणारी पुस्तकं त्या ठिकाणी मला वाचायला मिळाली. मला एक आठवण सांगयला आवडेल, माझ्या ब्लॉगवर खूप दिवसांपूर्वी लिहिलेल्या एका लेखाच्या शेवटी मी मर्ढेकरांच्या काव्यपंक्ती नमूद केल्या होत्या. त्या संदर्भात एका वाचकाचा मला इमेल आला की,
मर्ढेकरांची सदर कविता मला पूर्ण वाचायला मिळेल का?
त्यांनी तो मेल करण्यापूर्वी गुगलवर देखील सर्च केलं होतं.
पण त्यांना ती कविता मिळाली नाही. मुळ भारतीय असलेले ते गृहस्थ त्यावेळी लंडनमध्ये स्थायिक होते, त्यामुळे त्यांना कुठले ग्रंथालयही
(मराठी) संदर्भासाठी मिळणार नव्हते. दरम्यान माझ्या ब्लॉगवरील लेखात त्यांनी त्या ओळी वाचल्या आणि मला ईमेल केला.
योगायोग असा की मलाही त्या चारच ओळी तोंडपाठ होत्या. परंतु त्यांना पूर्ण कविता मिळवून देण्याचं मी वचन दिलं. त्यावेळी मी नगरच्या महिला महाविद्यालयात नोकरीला होतो. तिथल्या ग्रंथालयात मला ‘मर्ढेकर’
भेटलेच नाही. नंतर दोन वर्षे गेली पण मर्ढेकरांचे कविता संग्रह कुठेच मिळाले नाहीत. ‘मर्ढेकरांच्या कविता’ या कविता संग्रहात ही कविता होती. पण तो कविता संग्रह उपलब्ध होत नव्हता.
माझ्या मराठी विषयांच्या प्राध्यापक मित्रांनाही विचारलं पण त्यांनाही नाही मिळाली.
शेवटी कर्जतला बदली झाली आणि तिथल्या लायब्ररीत मला ती संपूर्ण कविता मिळाली.
आणि दोन वर्षांनी त्या वाचकाला मी इमेलद्वारे ती पाठवली.
फक्त ही एकच कविता नाही.
अशा अनेक दुर्मिळ गोष्टी कर्जतला त्या लायब्ररीत वाचायला मिळाल्या म्हणून ग्रामीण भागातलं असून देखील दादा पाटील कॉलेजचं ग्रंथालय मला जास्त समृद्ध वाटलं.
मला अनेकांनी पुस्तकं दिली, त्यातून मी हे शिकलो की आपणही कोणाला नकार द्यायचा नाही. माझ्याकडे फार जास्त संख्येने पुस्तकं नाहीत. पण जे काही आहेत ते सतत कोणीतरी घेवून जात असतं. माझी पुस्तके हे माझे कुटुंबीय आहेत. फक्त वाचून मला समाधान होत नाही,
म्हणून वाचायची राहिलेली अन वाचलेलीसुद्धा पुस्तकं मला संग्रही हवी असतात.
कोणी पुस्तक चोरलं की मला भयंकर चीड येते.
गेल्या काही महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, अशीच दोन महत्वाची पुस्तकं माझ्या एका मित्राने चोरून नेली.
‘डिरेक्टर डायरीज’ आणि ‘शॉर्ट कट’. ज्याने चोरली तो मित्रही सापडला – माझा मास कम्युनिकेशनचा सिनिअर ! काय बोलणार त्याला? मागितली असती तर मी भेट म्हणून देवून टाकली असती. तसेही अनेक मित्रांना वाढदिवसानिमित्त मी पुस्तकंच भेट देत असतो. मलाही माझे मित्र पुस्तकंच देतात. पण अशी चोरी करून काय मिळतं? बरं पुस्तकं चोरावीत का? अगदी उपलब्धतेचा कोणताच पर्याय उरला नसेल तर चोरीही ठिक समजू
(केवळ पुस्तकाच्या बाबतीत तेही वाचनाचं तितकं वेड असेल तर)
पण मागितल्यावर सहज मिळणार असतानाही तुम्ही चोरून नेता..?
हा अपमान नाही का त्या पुस्तकांचा? सुरेश भटांची
‘एल्गार’ आणि ‘रंग माझा वेगळा’
कोणीतरी वाचायला नेलीत पण अजून दिली नाहीत...पण ही चोरी नाही, मी समजतो विसर पडला असेल त्यांना...
पुस्तकं फक्त वाचून उपयोग नाही, ती नीट समजून घ्यायला हवीत. माझा एक मित्र भरभर पुस्तकं वाचत असतो. दिवसाकाठी एखादं पुस्तक वाचून संपवतो तो. पण त्यातलं त्याला फार काही आकलन झालेलं नसतं मग ही भरभर वाचण्याची स्पर्धा कशासाठी? धोधो कोसळणारा पाऊस तसाच वरवर वाहून जातो, पण संथ, रिमझिम कोसळणारा पाऊस मातीत खोलवर रुजत जातो. काहीतरी उगवायचं असेल तर तोच पाऊस महत्वाचा असतो. पुस्तकाचंही तेच आहे. पुस्तकांना वेळ द्यायला हवा, वाचण्यापूर्वी आपलं मन सुद्धा ते समजून घेण्यासाठी आतुर असायला हवं. मग फार गोडी लागते वाचण्याची. पुस्तकं बोलू लागतात..त्याचं अंत:करण उलगडत जातं आपल्याशी व्यक्त होताना...हो फक्त पुस्तकं नाही, त्यातले लेखक अन पात्रही हजारदा व्यक्त होत जातात त्यातून, म्हणूनच ‘युगंधर’ वाचताना आजही श्रीकृष्ण भेटतो आपल्याला, ‘मृत्युंजय’ मधून कर्ण आणि ‘ययाती’ मधून यती-ययाती भेटल्याशिवाय राहत नाही! अजून काय हवंय या निर्जीव वाटणाऱ्या पुस्तकांकडून ?
गेल्या तीन महिन्यांपूर्वी एका मित्राला मी ‘अग्निपंख’ भेट दिलं होतं. उद्या एका मैत्रिणीचा वाढदिवस आहे तिच्यासाठी सई परांजपेंचं ‘सय’ घेवून ठेवलं आहे. एका लेखक मित्रासाठी अरविंद जगताप याचं ‘पत्रास कारण की...’ असे ऐवज वाटताना, भेट देताना पराकोटीचा आनंद मिळतो. पुस्तकांमुळे माणसं समृद्ध होत राहतात अन नातीही. ‘भरलेली ओंजळ सतत वाहती रहावी’ हाच यामागचा उद्देश.
वाचलेलं नेहमीच स्मरणात राहतं असं नाही. कित्येकदा कवी, कविता आठवत नाही पण आशय मात्र मनात रेंगाळत राहतो. गीतकार प्रवीण दवणे यांचं ‘रे जीवना!’ वाचलं. त्यात त्यांनी सुंदर गोष्ट सांगितली. अशाच एका कवितेची. कविता आठवत नाही पण आशय सुंदर आहे – त्या कवितेत झाडाचं मनोगत सांगताना कवी म्हणतो- ‘मी एक झाड असलो तरी मेल्यानंतर मला जाळू नका, शक्य झालं तर माझ्या लाकडांपासून एखादी खिडकी बनवा, ज्या खिडकीतून एखादी दुरावलेली प्रेयसी आपल्या प्रियकराची आतुरतेने वाट पाहताना दिसेल...’ एखादं झाड इतका आशावादी विचार करत असेल? कवीच्या या कल्पकतेला मी त्रिवार सलाम करतो. ‘कुसुमाग्रज’ कधी प्रत्यक्षात भेटले नाहीत, पण ‘स्वातंत्र्यदेवतेची विनवणी’ आळवताना त्यांच्याशी भेट होते तेव्हा त्यांच्यासमोर नतमस्तक झाल्याशिवाय राहवत नाही. ‘एका पानाची कहाणी’ मी बारावीत असतानाच वाचलं. खरं सांगायचं तर त्यातलं आता काहीच आठवत नाही, फक्त खांडेकरांच आत्मचरित्र आहे इतकंच आठवतं! हा माझ्या बुद्धीचा दोष. मी ते पुन्हा वाचेन. पण आठवत नसलं तरी एक गोष्ट नक्कीच कळाली- त्या काळातल्या लेखकाची बालपणापासून होणारी जडण-घडण. खांडेकरांनी लेखक होण्यासाठी कुठे कोर्स केला नव्हता. एक दैवदत्त वरदान होतं प्रतिभेचं. त्याच साधनेतून ते प्रगल्भ होत गेले, म्हणून पुढे ‘ज्ञानपीठ’ पर्यंतचा प्रवास झाला. ‘कोसला’चंही तेच. हल्लीच्या काळात ओढाताण करून काहीतरी लिहित असलेल्या नवोदित लेखक-कवींनी विशेषत: नावासाठी, प्रसिद्धीसाठी झटणाऱ्यांनी याबाबत विचार करायला हवा.
मला वाचनाची आवड अन वेड लावण्यात नेवासा येथील ज्ञानेश्वर महाविद्यालयाचा खूप मोठा वाटा आहे. तिथलं ग्रंथालय आणि विशेष करून होस्टेलचाही. ग्रंथालयाने पुस्तकं दिली आणि वसतिगृहाने ते वाचण्यासाठीचं निवांतपण. त्या झपाटलेल्या रात्री मी कधीही विसरू शकणार नाही. ज्या काळात योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने करिअरचं टेन्शन घेवून अनेक मुलं संभ्रमावस्थेत सापडतात, त्याच वयात म्हणजे अकरावितून बारावीत जात असताना मला ही पुस्तकं भेटत गेली..वसतिगृहासमोरच्या वाळूवर रेंगाळत अनेक पुस्तकांवर बोलत बोलत रात्री घालवल्या आम्ही.. कोजागिरी साजरी करतानाही कविता अन चारोळ्याच होत्या आमच्या सोबतीला..मग त्या सहवासातून अमृत पाझरल्याशिवाय कसं राहील? ते क्षण, ते दिवस, ती माणसं अन त्यांच्यामुळे ही ‘पुस्तकं’ आयुष्यात नसती तर कदाचित मी केव्हाच आत्महत्याही केली असती, हेही खोटं नाही. कारण त्यानंतरच्या काळात खूप कठीण प्रसंग येवून गेले, कित्येकदा जगणंही नकोसं झालं. पण प्रत्येकवेळी पुस्तकांनी बळ दिलं. म्हणूनच ते आयुष्यभराचे सवंगडी झालेत माझे. अर्थात या पुस्तकांसारखीच काही समृद्ध ‘माणसं’ देखील भेटत गेली त्यांचंही योगदान आहेच या प्रवासात...पुढे कधी या जगण्याला अजून पालवी फुटली तर हा सारा प्रवास त्या पुस्तकांना अन त्या माणसाना समर्पित असेन...!
- - कृष्णा बेलगांवकर





No comments:
Post a Comment