Wednesday, June 3, 2020

सर, तुमच्या आठवणीत...




सर... आता नुसता हा शब्दही मनात आला तर भराभर कितीतरी 'रिझल्ट' समोर येतात. (त्यासाठी गुगलवर जाऊन वेगळं काही सर्च करण्याची गरज नसते.)

म्हातारीची गोष्ट... टुणूक टुणूक उड्या मारून दाखवत सांगणाऱ्या सरोटेबाई...
इंग्लिशमध्ये टेन्स शिकवताना मध्येच स्वतःची आतापर्यंतची जडणघडण सांगणारे ठाकरे सर...
“इतरही काही पुस्तके वाचत जा रे”, म्हणणारे पडवळ सर...
आणि अजूनही कितीतरी....(हे तर पेज वन ऑफ पन्नास..)
मग मी नुसतं डोळ्यांनीच कुठेही क्लिक केलं की ओपन होतात त्या सर्व आठवणी. पहिलीच्या सरोटे बाई दिसतात.
त्यांचा आवाज घुमायला लागतो कानात. "बबन चारा आण", "शरद बैलांना पाणी पाज".. क्षणार्धात मी त्यांच्या वर्गात पोहोचतो. मांडीवर पाटी धरून "अ... आ.... इ... ई..." गिरवत राहातो. वर मान केली की, समोर फळा दिसतो... मध्यभागी... "हसा, खेळा पण शिस्त पाळा" हा सुविचार. उजव्या कोपऱ्यात तारीख... वार... पटावर हजर... गैरहजर... सगळं सगळं अगदी तसंच दिसतं. ऊर भरून येतो. आवंढा गिळत मी हातातल्या पाटीकडे बघतो. त्या काळ्या पृष्ठभागाचा कॅनव्हास होतो.
हायस्कूलचे पाटील सर आठवतात. आपोआप पायथागोरसचा काटकोन, त्रिकोण तयार होतो. SinQ, CosQ डोक्याभोवती घुमत राहातात..

मी पुन्हा वर पाहतो. समोर फळ्यावर चक्क चव्हाण सरांच्या समीकरणाच्या दोन बाजू... ते झपाटल्यागत दोन्ही बाजूंचा ताळमेळ लावत राहातात. 'एक्स' ची किंमत सापडण्यासाठी त्यांचा प्रचंड खटाटोप सुरु असतो.. फळा पुसणं, भरणं चालूच राहातं..
मला अजूनही चांगलं आठवतंय... एवढं करून शेवटी 'एक्स'ची किंमत मिळाली की; त्यांचे डोळे बोलके होतं. सर सगळं शिकलो. पण डोळे बोलके कसे ठेवायचे तेवढंच शिकायचं राहून गेलं बघा... आणि एक सांगू सर... इथे एकमेकांच्या खांद्यावर पाय देऊन वर चढणारे अगदी मजेत असतात. दुसऱ्याच्या कामाचं श्रेय स्वतः घेणाऱ्यांची तर चक्क प्रगती होतेय... एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्यांची संख्या तर प्रचंड वाढलीय. पण सर, दुसऱ्यांच्या कामाची स्तुती करणारे क्वचितच दिसतात इथे... ‘सर थांबा ना... एक मिनिट... ऐका तर...’ डोळ्यातल्या पाण्यामुळे सर हळूहळू अस्पष्ट होत जातात... दिसेनासे होतात.. मी पुन्हा आठवणींच्या 'होम' पेजवर येतो. मोठा उसासा टाकतो.
खरंच! रात्र दिवसापेक्षा किती वेगळी असते. दिवस... रागीट बापासारखा...पण रात्र मात्र हळूवार डोकं थापटणाऱ्या आईसारखी... थोडी हळवी... थोडी शांत...! तितक्यात चेहऱ्यानेच बोलणारे दत्ता सर पाठीवर हात ठेवतात. निखळ हसत येऊन हेमंत सरही गच्च मिठी मारतात.. खूप छान वाटतं आणि प्रचंड धावपळीतही संदीप खरेंचा मेसेज येतो तेव्हा आकाश ठेंगणं होतं. त्या क्षणी जरी काही सुचलं नाही तरी रिप्लाय देण्याचा मोह काही टळत नाही.
हळूहळू रात्र चढत जाते, तसे भरवीरकर सर समोर येतात.. थोडं हळवं होऊन बोलतात.. "मी जिथून खूप पटकन निघून आलो ना... अमोल, तू तिथेच थांबून राहीला आहेस अजून.." नक्की कसं रिअॅक्ट व्हावं मला कळतं नाही.. मी हसतो फक्त; पण का? कुणास ठाऊक? अचानक मंजिरी आठवते.. मला कविता शिकवणारी.. जिचा चेहरा मी अजुन शोधतो आहे.. माझ्याच आतमध्ये... पण "मीही" आता जास्त आतवर जात नाही.. हळवा होत नाही. डोळ्यांची दोन-चार वेळा उघडझाप करतो. पटापट काही ऊबदार थेंब गालांवरून ओघळून जातात. मग थोडं बरं वाटतं. आठवणींचं पेज "रिफ्रेश" होतं. मी आठवणींतून वर्तमानात येतो नि समोर दिसतात ते ऑफिसातले सर...!!
मिनिटा-मिनिटाला वेगवेगळ्या 'प्लांट'ची डिटेल्स माहिती घेता घेता.. बाबू सर, अरविंद सर नकळतच आयुष्याचा हिशोब शिकवत राहतात.. शांत शांत दिसणाऱ्या जाधव सरांच्या मनात मात्र प्रचंड आकडेमोड सुरू असते.. एकीकडे दिघे सरांचा ‘प्रॅक्टिकल अॅप्रोच’ आणि दुसरीकडे महाले सरांची ‘समय सूचकता’ आत्मसाद करण्यासारखी असते.. बोरसे आणि सोनार सरांच प्रत्येक सूक्ष्म निरीक्षण 'रिझल्ट ओरिएंटेड' असतं.. मध्येच कामासोबत आयुष्याचा आनंद कसा उपभोगायचा याचं 'सिक्रेट' ओपन करत माळी साहेब समोर येतात.. प्रदीप व अखिलेश सरांकडून कामाप्रती असलेली 'सिन्सियारिटी' शिकायला मिळते.. शिरसाठ सरांच्या तर 'मौना'तही प्रचंड काही दडलेलं असतं... दुसाने आणि आहेर सर नेहमीच कामात 'एंगेज' असतात.. महाजन आणि पिम्प्रीकर सरांचं 'प्रेझेंस ऑफ माईंड' तर सनी सरांचं ‘सिस्टम’बद्दलच नॉलेज समोरच्याला थक्क करून जातं.. रोजच्या रूटीनला छेद देत स्वतःचे छंद कसे जोपासायचे हे प्रधान, विशाल शिकवून जातात.. वेळेत काम कसं मॅनेज करायचं हे माझाच नावकरी मित्र अमोल आणि योगेश दाखवून देतात... हा प्रत्येक माणूस मला कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी आदर्श वाटतो...
आणि एक रागीट... भयंकर तापट...सर माझ्या घरीही असतात. किराणा वहीच्या हिशोबातून असंख्य चुका काढणारे हे सर, मला आजही... आताही... या जगात काटकसरीने जगायला शिकवत आहेत.. मीही शिकतो आहे. आता... आता... नकळतच अधूनमधून का होईना पण मीही गाडीचा अॅव्हरेज चेक करतो आहे. त्याशिवाय कुठलीही लाज, कमीपणा वाटून न घेता पावशेर मिरच्यांसाठी मीही आता वाटा-घाटी चालू केल्या आहेत. या सर्व सरांच्या तालमीत एक नवखा तरुण सर होऊ पाहत आहे. येणाऱ्या पिढीचा 'सर' होण्यासाठी...
- अमोल जगताप



2 comments:

  1. खूप छान!, तुमच्या लेखाने मला माझ्या शाळेच्या पटांगणात उभं केलं!

    ReplyDelete