Saturday, April 18, 2020

कधीतरी वेड्यागत वागायला हवे...



(सुप्रसिद्ध कवी, गायक आणि गीतकार संदीप खरे याच्या "कधीतरी वेड्यागत वागायला हवे.." या नाट्यरूपातील कवितांच्या कार्यक्रमाचा अनुभव.. वाटलं शेअर करावा... त्यानिमित्ताने.....) 
कधी रात्री लावुनिया नयनांचे दिवे
पुस्तकाला काहीतरी वाचायला द्यावे
शोधुनिया प्राणातले दुमडले पान
मग त्याने आपल्याला चाळायला हवे
कधीतरी वेड्यागत वागायला हवे..
या ओळी घेऊन जेव्हा संदीप स्टेजवर अगदी सहजपणे वावरत असतो तेव्हा कविता नावाचे दिव्य हळुहळू आपल्यासमोर उलगडत जाते. तेही नाट्यरूपात. या कविता, त्यातील भावना... प्रत्येक शब्द हा संदीपचा नाही उरत मग. आपणही नकळत स्टेजवर वावरत राहातो. संदीपच्या म्हणण्याप्रमाणे तेव्हा कुठे आपल्यातलं नेटवर्क खऱ्या अर्थाने सुरू होतं. या कार्यक्रमाच्या प्रयोजनाबद्दल बोलताना संदीप म्हणतो,
कुणीतरी काहीतरी सांगायला उत्सुक आहे आणि कुणीतरी काहीतरी ऐकायलाही उत्सुक आहे. बस्स अशांसाठी... कधीतरी वेड्यागत...
स्टेजवर मंद प्रकाश... त्यात दिसतेय एक खोली... टेबल... खुच्या... अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू... भिंतीवर चार्ली चॅम्पिलनचा फोटो नि आपण हे सारं निरखत असतानाच संदीप पढे येतो. दीर्घ श्वास सोडत भिरभिरत्या नजरेने खोलीकडे बघत म्हणतो..

 बॅचलरच्या घरात मध्यभागी तरंगत राहाते आभाळ...
 खिडकीबाहेर मान काढायची गरज राहात नाही त्याला...
या सुरुवातीच्या ओळींनाच आपल्यातला बॅचलर जागा होत जोरजोरात टाळ्या देतो. संदीपच्या शब्दात ताकद आहे. समोरच्याच्या मनाला भिडण्याचा प्रत्यय हरएक कवितेदरम्यान प्रेक्षकांच्या टाळ्यांमधून येत राहातो. हळवार पावलांनी विभावरी स्टेजवर येते आणि हातवारे करत, गालातच हसत संदीपला “हाऽऽय..”करून निघून जाते. तशी संदीपसह आपलीही चलबिचल सुरू होते नि मनातच कल्पनांचं जाळं विणत तो म्हणतो...
एकदा ती हसली अन् जन्म झाला सार्थ हा
क्षणभरावर नोंद केवळ युगभरावर वंचना...
काय ती करते खुणा अन काय माझ्या कल्पना..” लागलीच कॉलेज जीवनात घडणारे, घडलेले असे प्रसंग सर्रकन डोळ्यांसमोर येऊन जातात... आणि मी बोलणारच होतो पण संदीप माझ्या जरा आधी बोलला या आविर्भावात आपण खुर्चीवर जरा ताठ बसतो. हात लांबवत... दीर्घ श्वास घेत तो म्हणतो...
उभा आहे मस्त खुशाल,
थंडीच झालीय माझी शाल..!
काटा माझ्या अंगावर
गुलाब तिच्या गालांवर
कसा निघेल इथून पाय
वेड लागेल नाही तर काय...!!
भावनांना टिपण्याची जितकी क्षमता संदीपच्या कवितांमध्ये आहे. तितकीच त्याच्या आवाजातही आहे. ऐकणाऱ्याला अक्षरश मदहोश करून टाकणाऱ्या त्याच्या आवाजातन मादकता ठिबकते. कवितेत नेमक्या ठिकाणी घेतलेल्या त्याच्या प्रत्येक पॉजमधून कविता काळजापर्यंत उतरत जाते..

बॅकग्राऊंडला विजांचा कडकडाट होतो. पावसाचा आवाज जोर धरतो. तो धावत खिडकीपाशी जातो. बाहेर डोकावतो. मग पुन्हा पावसासोबत तिची आठवण दाटते. अगदी आपल्यासारखीच त्याचीही अवस्था होते. खरं सांगायचं तर संदीप कविता म्हणत नसतोच मुळी. तो आपलंच मन उलगडून सांगत असतो आपल्यालाच. ते हवंहवंस दुख...आज.., आताही मनाला हवंच असतं...

नको करू सखी असा साजिरा शृंगार
आधीच कट्यार.! त्यात जीवघेणी धार...!!
कशासाठी घालायचे काजळ डोळ्यात
गर्द डोहावर राणी पसरेल रात...!!!
या कवितेत अमृता वेलणकरच्या मोहक हालचाली खल्लास करून जातात. तिच्या सशक्त अभिनयाचा प्रत्यय देऊन जातात. विभावरी देशपांडेचा आवाजही प्रचंड लवचीक आहे. कधी भयंकर आतं, तर कधी भावनिक चढउतार घेत.. ती कार्यक्रमातलं तिचं अस्तित्व अजिबात कमी पडू देत नाही.
कवितेबद्दल संदीपचं मत अतिशय साधं-सोपं... नि काळजाला भिडणारं आहे. तो म्हणतो...
कविता म्हणजे असतेच काय
वाळूत मागे उरले पाय..!!
असे कधी चाललो होतो...
या शिवाय दुसरे काय...!!!
कवितेबद्दलच्या या ओळी कानावर पडताच मन पुन्हा हळवं होतं. जुनं बरंच काही आठवतं...पहिली कविता... ती कशी सुचली ते... अन् ती जिच्यावर केली तीही, पुस्तकाची पाने चाळावी तशी भराभर तिच्या आठवणी समोर येतात. जरी डोळे पाणावले तरीही एक सुखद, हळवा अनुभव आपल्या वाट्याला देऊन जातात. आवंढा गिळत जरा ध्यानावर यावं तर... समोर खुर्चीवर बसून संदीप लव्हलेटर लिहिण्यात मग्न...!!
 पण हे प्रेम सर्वांनाच मिळतं असंही नाही. परिस्थितीमुळे किंवा अन्य काही कारणांमुळे ती त्याची होऊ शकत नाही पण त्याच्या मनाची तळमळ  तो तिला कधी जाणवू देत नाही.
पावसाला पापण्यांनी थोपवावे लागते
सर्व आहे ठीक ऐसे दाखवावे लागते...!!
हळुहळू स्टेजवर अंधार पसरतो. रातकिड्यांचा आवाजवाढतो. ती झोपण्याचा प्रयत्न करते. सारखी कुस बदलते पण... पण त्याच्या विरहामुळे डोळे काही लागत नाहीत. तिकडे तोही आकंठ जागा असतो..
रात्र होऊन जाईल चंद्र चंद्र आणि मी जागाच असेन..
तेव्हा बर्फाच्या अस्तराखाली वाहत राहावी नदी तशी तीही जागीच असेल
मला खात्री आहे, तिला झोप आली नसेल..
स्वतसोबत तिच्याबद्दल एवढं खात्रीपूर्वक सांगणाऱ्या या प्रामाणिक प्रेमवीरासाठी डोळ्यातून अश्रू ओघळून जातात. अस्वस्थता जाणवत राहाते. विचारांचं काहूर माजतं. वर्तमानात येऊच नये असं वाटतं. तेवढ्यात प्रेमाची संदर स्वप्ने मनात खुलवून अचानक सर्व काही विसरून गेलेल्या तिच्या त्या “स्मरणशक्ती”बद्दल संदीप त्याच्या कवितेतून म्हणतो,
नेमके आठवत होते तुला
कवितांनी बोट ठेवले होते
ते नेमके कुठल्या क्षणांवर
आणि मनावरून पानावर
गोंदल्या गेल्यावरही
कुठली कविता कितव्या पानावर
अफाट होती तुझी स्मरणशक्ती
मलाच कशी काय विसरलीस..
कुणास ठाऊक....
मनाला या दुखात गटांगळ्या खाऊ न देता तो त्याचं स्वप्न सांगत खळखळून हसवतोही.
कार घेऊनी आलिशानशी
कुणी कामिनी मला भेटली...
बॉन्ड मला समजून पुढे
अंगावरती जरा रेलली...
दत्तगुरूंचे नाव घेऊनी...
ओठ ठेवले... मी...बोटांवर...
आठवते मज हसला होता
रस्तासुध्दा त्या स्वप्नावर..


डोक्यातले दररोजचेच तेच तेच विचार थोडे बाजूला पडतात. कार्यक्रम बघताना महागाई, लाईट बिल, लेटेस्ट पेट्रोलचे भाव असले एरवी डोक्यात घुटमळणारे विचार आसपासही फिरकत नाहीत. मस्तपैकी रिलॅक्स वाटतं. तस्संच खुर्चीवर रेलून... संदीपच्या कवितांचा नायक होऊन... तो साराच प्रयोग...संपूर्ण प्रवास...आपण अनुभवत राहातो.
मग नकळत स्वतःच स्वतःच्या मनाचा ठाव घेत-घेत तो कार्यक्रम... कवितांच्या गावाचा फेरफटका अविस्मरणीय होऊन जातो..
भांड्यावर भांडे कधी भिडायला हवे
उगाचच सखीवर चिडायला हवे
मुखातून तिच्यावर पाखडत आग
एकीकडे प्रेमगीत लिहायला हवे.
कधीतरी वेड्यागत वागायला हवे...!!!

अमोल जगताप 


14 comments: