(मित्रांनो... "मला आवडलेलं... खास तुमच्यासाठी
निवडलेलं..." यात.. आज मी तुम्हाला दत्ता पाटील सर यांचा एक लेख शेअर करतो आहे..
त्यांच्या लिखाणाबद्दल बोलावं एवढे काही आम्ही कोणी मोठे नाही... पण सांगेल एवढंच...
त्यांचा शब्द शब्द साचून राहतो मनात.. हा लेख मी या आधीही कित्येकदा वाचलाय.. पुढेही
वाचेल.. पण जादू काय आहे माहीत नाही, खेचला जातो मी पुन्हा आपोआप... तुम्हीही वाचा,
पण जरा निवांत हं... मग बघा तुमच्यातलं ‘नेटवर्क’ कसं ऍक्टिव्ह होतं ते...)
नाऊ इट्स सेफ टू टर्न ऑफ युअर कॉम्पुटर !
कॉम्प्युटर शट डाऊन करण्यासाठी मी क्लिक करतो. मायक्रोसॉफ्ट
एक्सेलमधल्या डॉगीच्या चार आणि माझ्या पाच अशा एकूण नऊ जांभया झालेल्या... तो मघाशीच
शहाण्या कुत्र्यासारखा स्क्रीनवरच्या भिंतीपलीकडे टुणकन उडी मारून गेलेला... न थकलेला
कॉम्प्युटर दोन क्षणांचं झकास म्युझिक ऐकवत शांत होतो... शट डाऊन होताना ‘विन्डो’ काही
क्षण स्क्रीनवर रेंगाळलेली... दिवसभर एकत्र काम केल्यानंतर मैत्रीण झालेली एखादी ती
दररोज ऑफिस सुटल्यावर ‘बाय’ करताना उगीचच रेंगाळल्यासारखी वाटावी तशी.. मैत्रीण ‘बाय’
करते... मीही जांभई देता देता ‘ओऽऽ क्केऽऽ..’ म्हणत मेनस्वीच ऑफ करतो... बंद स्क्रीनकडे
काही क्षण बघत राहातो... मग उठतो... लक्षात येतं, आपण आज जीममध्ये गेलो नाही... आज
तो एक मुलगा स्क्रीप्ट दाखवायला घेऊन येणार होता... ‘पहिल्यांदाच लिहिण्याचं धाडस करतोय,
गाईडन्स करा’ म्हणाला होता... “युवकांच्या जीवनातली अस्वस्थता मला भंडावून सोडते -
हीच घुसमट मी या नाटकातून उतरवली आहे”, असं काल तो पोटतिडकीनं सांगत होता... मला पुन्हा
जांभई येतेय... एक वाजलाय रात्रीचा.. एक्सेलमधला डॉगी घोरत असेल आता... किंवा कंटाळून
एस्सेल वर्ल्डमध्ये गेला असेल... शी! फालतू कोटी सुचतेय आपल्याला... बहुदा झोप येतेय
डोळ्यावर... आता त्या मुलानं कोणत्या तरुणांची घुसमट नाटकात लिहिलीये कुणास ठावूक !
परवा त्याला विचारलं, ”तू फार दुखी आहेस का रे ?” म्हणाला, “तसा दुःखी नाही पण हे जे काही या देशात
चाललंय, त्यानं मी अपार अस्वस्थ झालोय...” आणि मग त्यानं कोपऱ्यावरच्या टपरीवरून सिगारेट
घेतली... शिलगावली... कोवळं ऊन अलोट धुरानं काळवंडून जावं तसा तो दिसत होता... मग तो
काही वेळ धुरासारखं संदिग्ध बोलत राहिला... देशीवाद, साम्यवाद, समाजवाद, प्रांतवाद,
भाषावाद, दहशतवाद... बापरे, किती वाद असतात..! मी बर्म्युडाच्या खिशात हात घालून गॅलरीत
उभा... दीड वाजलाय... शांतता... तरीही पंचेचाळीस फ्लॅट्सच्या सोसायटीत एखादं तरी दार
वाजतंच... कुठून तरी फ्लशचा आवाज, च्यायला, पाच वर्षांपूर्वी या नगरीत आलो तेव्हा नदीची
झुळझुळ काय, ओढ्याची खळखळ काय, पानांची सळसळ नि काय काय लिहीत होतो..! एकदोन स्थानिक
नियतकालिकांनी चारपाच असे लेख ललित या सदराखाली छापले होते ! (अच्छा, हे ‘ललित’ असतं
होय! आपली मनातली त्यावेळची खरी प्रतिक्रिया.) आणि आता फ्लशचा खळाळ..! एक्सेलच्या कॉलनीतला
डॉगी निसूर झोपला असेल... सू सू करायलाही उठत नसेल का तो. फ्लशच्या खळाळत विंगेत येऊन
कपडे बदलावेत तस रात्रीनं प्रहर बदलून घेतला! वा! लालित्य हे बदलत्या जगाला अनुरूप
असायला हवं, आपण त्या स्क्रीप्टवाल्या मुलाला उद्या हे ऐकवू... कॉम्प्युटर शट डाऊन
करण्यापूर्वी फाईल सेव्ह करताना नावं काय दिलं होतं. आठवलं – ‘भाऊसाहेब..!’ आपल्या
वॉचमनचं नाव. दोन वाजलेयत... त्याच्या मुलाचं रडणं आज ऐकूच आलं नाही... त्याच्या घरातून
सकाळी दहाला खलबत्त्यात मिरची कुटत असल्याचा आवाज येतो... ठण... ठण... ठण...
आई म्हणायची, “तीन पोळ्या नि ठेचा दिलाय... परत आणू
नको... दुपारी खाऊन घे रे बाबा...” आईचं स्वयंपाकघर म्हणजे म्युझिक रूमच होती... खलबत्त्याचा
ठण... ठण... ताल... चूल ‘फुंकणी’... आणि मागे पाणी तापविणारा बंब गोवऱ्या, कोळसे, ढलपे जाळताना
ट्रकच्या छपरी क्लीनरसारखा रिमिक्स गाणी गायचा...
वॉचमनच्या घरातला खलबत्त्याचा आवाज संपला की, सोसायटीच्या
विविध खिडक्यांमधून मिक्सरचा आक्रोश, दमेकरी कुकरचे उच्छ्वास, प्लायवूड कापणाल्या मशिनची
काळीज चिरत जाणारी किंकाळी असा वाद्यमेळ सुरू होतो नि मग माझा दिवस सुरू होतो. अंथरूणातून
उठलो की, खालून शाळेची मुलं घेऊन जाणाऱ्या रिक्षावाल्याच्या विविध मुलांना आर्त हाका
सुरू होतात... मुलांबरोबरच त्यांच्या शिक्षणाची काळजी वाहणारा हा रिक्षावालाच खरा शिक्षणमहर्षी..!
उफ..! अडीच वाजलेयत... गॅलरीच्या पाच बाय सात एवढ्याच उघड्या जागेत बरंच आभाळ मावतं!
जेवढे दिसतात तेवढेच तारे मोजायचं ठरवलं, तरी आयुष्य संपून जाईल.. बरोबर नैऋत्य कोपऱ्याला
टपोरा तारा झगमगतोय... फार लिहून झालंय ताऱ्यांवर... गाणीविणी... अस्पर्श असं काही
राहिलंच नाही... कल्पनांचंही जागतिकीकरण होऊन गेलंय सालं... थंडी वाढतेय... झोपायला
हवं... एक्सेलमधल्या डॉगीनं आता तर झोपेची अतिगाढ अवस्था गाठली असेल... डॉगी झोपलेला
नि मी राखण करीत असल्यासारखा जागा..! शांतपणे पडलो. ब्लँकेट ओढलं... उद्या आपण बाजारात
तोंडात केस न जाणारं ब्लँकेट शोधायला जायला हवं... अन्य एका मित्रानं बोलवलंय घरी...
त्याच्या भावानं विदेशातून येताना माझ्यासाठी बॉडी स्प्रे आणलाय... महागडा असेल खूप...
आणि उद्या जीम... आणि स्क्रीप्ट... ‘जागोजागी पेरले आहेत तरुणांच्या वेदनांचे बॉम्ब’...बापरे!
‘आपणही इनबिल्ट कम्युनिस्टच असतो’, असंही काल तो म्हणाला होता...! कम्युनिझम... सोशलिझम...
उद्या आईची दम्याची औषधं घ्यायचीत... मोबाईल कुठं ठेवलाय मघाशी रिमाईन्डर सेट करायला
हवं होतं... काल तर इतके रिमाईन्डर सेट केले होते, की पाचवं काम करताना दहाव्या रिमाईन्डरची
घंटी वाजत होती.. उद्याचा आख्खा दिवस बिझी.. सिनेमॅक्सला ‘हनुमान’ लागलाय... बघूच या...
सकाळी दोन ड्रेस धुवावे लागतील... परवा मेनरोडवरून कपडे वाळत घालण्याची दोरी आणलीये...
बांधलीच नाही अजून... नुसती कचकच मेनरोडवर... त्या थिएटरच्या गेटवर काय पोस्टर होतं
ते? हां..! ‘मेरी प्यास बुझाओ!’ मित्र म्हणाला, ‘अरे, दुष्काळी भागावरची डॉक्युमेन्टरी
फिल्म आहे ही!’ केवढे जोरात हसलो आम्ही..! सगळा मेनरोड आमच्याकडे पाहात होता... डॉगी
इथे काय करतोय... हा तर झोपला होता ना... काय विचारतोय हा? डू यू वॉन्ट टू सेव्ह द
चेंजेस यू मेड टू बुक वन? म्हणजे? मघाशी तर घोरत होता... बहुदा आईन पाठवलं असेल त्याला...
जेवणासाठी निरोप द्यायला... डॉगी-मित्र-स्क्रीप्टवाला-आई-वॉचमन-त्याचं शेबडं पोरगं-सगळे
कॉम्प्युटरभोवती काय करताहेत कोण जाणे... उफ्...! डॉगी कंटाळून निघतोय... मला सोबत
हवीच... मग मी त्याच्या पाठोपाठ...!
- - दत्ता
पाटील



एक पोळी आणि ठेचा खाऊ घाला राव..लई उपकार होतील बगा...
ReplyDeleteVery very nice Datta Patil you are great god bless you
ReplyDeleteखूप छान शब्द रचना केलेली आहे .. अप्रतिम
ReplyDeleteछानच!👍
ReplyDeleteThanks all
ReplyDeleteखूप छान
ReplyDelete