Friday, April 24, 2020

मला आवडलेलं.. खास तुमच्यासाठी निवडलेलं..


हेमंत भोसले... या माणसाला मी कधीही गंभीर चेहरा करून बसलेलं बघितलेलं नाही.. परिस्थिती कितीही अवघड असली तरी.. कधीही भेटा.. हसरा चेहरा... आणि मित्रांसोबत आलेल्या तिऱ्हाईत माणसाशी मैत्री करायला यांना मोजून पाच मिनिट सुद्धा लागणार नाहीत.. हवं तर ट्राय करून बघा.. तुम्हालाही हा अवलिया अगदी मनमोकळं बोलायला भाग पाडेल यात शंकाच नाही... लेखाबद्दल अंदाज आला असेलच.. मग करा एन्जॉय... कारण पोट धरून हसवण्याचा असा 'माहोल' क्वचितच तुम्हाला कुठे भेटेल...

दिन दिन दिवाळं...!!!

लाडवांची मोठी रास अंगावर कोसळतेय.... करंजीचा उपयोग धनुष्यबाणासारखा केला जातोय... चकलीच्या वेटोळ्याला सरळ करून सपासप पाठीवर सटकारे दिले जाताय, असे भास आता क्षणोक्षणी होऊ लागलेत. ऐन दिवाळीत मानसिकता ढासळायला सीमाच उरली नाही. एखादी मोठी भक्कम गढी वाऱ्याच्या झळकेनिशी कोसळावी तशी माझ्या मनाची अवस्था झालीय. कारण यंदा पुन्हा दिवाळी आलीय. नव्हे दिवाळं आलंय. दिवाळीचं हे कवित्व यंदाही माझ्या जीवावर उठतं की काय, या भीतीनं झोप लागणंही मुश्कील झालंय. कारणीभूत आहे मागची दिवाळी. गेली दिवाळी लग्नानंतरची पहिली दिवाळी असल्याने मोठी उत्सुकता होती. बायकोनंही आपल्या हातच्या फराळाचे माहेरी कसे कोडकौतुक व्हायचे, याची मोठी मालिकाच सांगितली होती. तेव्हा अशा सुग्रण बायकोच्या हातचा फराळ खायला कोणाला उत्सुकता नसणार...?
आश्चर्य म्हणजे एका दिवसात फराळाचे सर्वच पदार्थ बनवून हिने गिनीज बुकात नाव नोंदवायची तयारी सुरू केली होती. फराळाचे ‘ते’ एकसे एक आयटमस् खरंच आठवणीत(च) ठेवण्यासारखे होते. वरून पांढरीशुभ्र दिसणारी करंजी न तुटता ‘समुद्र सपाटीपासून’ तीन फूट वर उचलणं म्हणजे एक दिव्यच. उचलल्यावर राजस्थानच्या वाळूप्रमाणे हातात भुगाच राहायचा. इकडेतिकडे बघत हळूच मूठ दाबून मग त्या भुग्याचा लाडू करायचा अन् ‘लाडू फार आवडतात बुवा’, म्हणत खोट्या आविर्भावात मिटक्या मारत खायचा. शंकरपाळ्यांचं तर विचारूच नका. ती शंकरपाळी होती की ‘लिटलस्टोन’ हे शेवटपर्यंत कळतच नाही. किडनीस्टोनला लाजवेल, असं सौंदर्य लाभलेल्या शंकरपाळ्यांना खायला मोठी ‘डेअरिंग’ लागत होती.
लाडू तर एवढे स्ट्राँग होते की, खाताच दात ब्रेकडान्स करायला लागायचे. मिक्सरमध्ये टाकले तर त्याचे पाते वाकले. खलबत्यात कुटू म्हटले, तर तिथूनही तो स्प्रिंगसारखा टुणकन उडी मारून बाहेर यायचा. शेवटी रागाने त्याच्यावर मुसळी हाणली, तर तो उडून कपाळावरच बसला अन् बॉम्ब फुटल्यागत कपाळाची अवस्था झाली. एवढे पुरेसे नव्हते की काय तोच चकल्यांचा आग्रहही मोठ्या ‘प्रेमाने’ (की रागाने) व्हायचा. ही चकली उचलली तर त्यातून अभिषेक घातल्यागत तेल निथळायचं, तरीही बायकोच्या ‘हस्तकलेला’ व्यासपीठ मिळावं म्हणून खात गेलो अन् नरड्याचा बिघडलेला तुनतुना (करकर आवाज करणारा) करून बसलो. बोलायला गेलो, तर मधूनच जुनं पातेलं घासल्यागत आवाज यायचा. ‘वाकेल पण मोडणार नाही’, अशा बाण्याच्या अनारशानेही काही कमी छळलं नाही. वातड तर एवढा की, लहानपणी रस्सीखेचच्या खेळात दोरीऐवजी त्याचा वापर केला असता तरी चाललं असतं. अंगाला भरपूर माती चोपडून आखाड्यात उतरणाऱ्या पहिलवानागत हे ‘अनारसं’ फराळाच्या ताटात (आखाड्यात) अंगाला भरपूर खसखस चोपड़न उतरलेलं... ‘खाऊन दाखवा अन् बक्षीस जिंका’, अशा आविर्भावात वाकुल्या दाखवत ‘करशील का लग्न?’ म्हणून जण चिडवतच होतं. सकाळी हा फराळाचा छळ, तर रात्री फटाक्यांचा..! फटाके फोडण्याच्या माझ्या अनुभवावरून ‘फोडणं’ हा शब्द फक्त ‘नशीब फोडणं’, ‘फोडून काढणं’, ‘डोकं फोडणं’ एवढ्यासाठीच वापरायला हवा, असा ठाम समज झालाय. लग्नापूर्वी एकदा लवंगी फटाक्याला भिऊन जो पळत सुटलो तो थेट पेटलेल्या सुतळी बॉम्बवरच जाऊन आदळलो होतो. 
त्यामुळे यंदा नागगोळीसुध्दा पेटवायची रिस्क घ्यायची नाी, असं ठरवूनच टाकलं होतं पण आलीया भोगासी. असावे सादर..!

साले (शिवीतले नाही नात्यातले) मंडळींच्या विशेषत साल्यांच्या आग्रहास्तव अंगणात फटाके पाहायला मागच्या वर्षी गेलो. अन् शत्रुपक्षाने सर्वच अस्त्रांची तोंडे आपल्याकडेच नेम धरून रोखली असल्याचा भास झाला. या सर्वांमध्ये सर्वात भयंकर अस्त्र होते ते रॉकेट, ‘बाटली’ आणि डोक्यातील ‘दारू’ शिवाय न उडणारे हे ध्यान वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवायला आलेल्या विमानागत डोक्याकडे धाव घेते की काय, या भीतीने मी जीव मुठीत धरून उभा होतो.
तेवढ्यात मघा पेटता पेटता राहून गेलेल्या सुतळीने अचानक बंडखोरी केली अन् कानावर हात ठेवण्याआधीच कानठळ्या बसवून गेला. फुटल्यावर तर काही क्षण साक्षात उस्ताद बिस्मिल्ला खान येऊन शहनाई वादन करीत असल्याचा भास होत होता. मंदिरात घुमतो तसाच दीर्घ वेळ ‘किऽऽणऽऽ‘ आवाज माझ्या कानात घुमत राहिला. या किणकिणीतच अधूनमधून लवंगी फटाकेही ‘कोरस’ची भूमिका बजावत होते. शेवटी वैतागून ‘बस करा ही कटकट’ म्हणून काढता पाय घ्यायचा प्रयत्न केला; पण माझी दाणादाण पाहून साले मंडळींनीच आवाजाचे फटाके न फोडण्याचा निर्णय घेतला.
‘आता आतषबाजी जीज्जू’ म्हणत अगदी वीतभर कपडे घातलेल्या नट्यांच्या फोटोंचे बॉक्स भराभर बाहेर आले; पण या पूर्वीच्या अत्याचाराने हतबल झालेला ‘मी’ आता या आतषबाजीसमोर बळीच्या बकऱ्याप्रमाणे निर्व्याजपणे उभा होतो. तेवढ्यात भामटा भुईनळा सातबाराच्या उताऱ्यावर आपले नाव नसूनही दुसऱ्याची जमीन (आंगण) आपल्याच बापाची आहे, अशा थाटात उभा राहिला. पेटल्यावर सुरुवातीला त्यानं सुंदर सुंदर देखाव्यांचं झाड उभं केलं अन् क्षणार्धात दिवाळखोरी जाहीर करून मोकळा झाला. भुईचक्राचं गरगरणं मानसिक संतुलन हरवलेल्या जीवाप्रमाणे दिसत होतं, तर कधी पिसाळलेल्या कुत्र्यासारखं दिशाहीन गरगरणं वाटत होतं. गोळीतला नाग ‘कालिया, कोब्रा’ किंवा ‘अॅनाकोन्डा’ असल्याचा दिमाख दाखवीत होता. हे सारं सहन करत मी मनाला खोटं खोटं प्रसन्न करू पाहात होतो. अगदी पिशवीतला माल संपल्यानंतर फुसके फटाके वेचून कागदावर केलेल्या दारूच्या ‘आतषबाजी’ पर्यंतचा अत्याचार मी सहन करीत होतो तो पुढली दिवाळी हिमालयातील एकांताच्या गर्तेत साजरी करायचा संकल्प सोडत...!
- हेमंत भोसले 


11 comments:

  1. एकदम मस्त अमोल.

    ReplyDelete
  2. संदिप भोरApril 24, 2020 at 11:10 AM

    छान अमोल

    ReplyDelete
  3. हेमंत सर अप्रतिम टिप्पणी केली आहे दिवाळीच्या फराळावर आणि फराळ बनवणाऱ्या वर ... पण तरी ही एक प्रश्न तुम्ही कधी हे सर्व सांगण्याची डेरिंग केलीय का? घरी
    ( मयुर शशिकांत गांगुर्डे )

    ReplyDelete
    Replies
    1. हा प्रश्न तू त्यांना विचारतोय की मग अशी परिस्थिती आली तर काय करायचं हे ठरवण्यासाठी ही गुगली टाकलीय...
      बाय द वे.. तुला तर तसं डायरेक्ट सांगावं लागेल... कारण त्यांनी लिहून मन मोकळं केलं.. तुला तेही जमणार नाही... तेव्हा प्रॅक्टिस करून ठेव.. (म्हणजे चौकापर्यंत फिरून येत जा या कोरोना काळात..) ...हा..हा...

      Delete
  4. खुप छान!
    वाचून पदार्थ चाखल्यासारखे वाटले.

    ReplyDelete