Saturday, April 25, 2020

मला आवडलेलं... खास तुमच्यासाठी निवडलेलं...




प्रशांत भरवीरकर.. म्हणजे अगदी शांत.. स्वच्छ स्वभाव आणि नावाप्रमाणेच मोठ्ठं मन असलेला माणूस... समोरच्याच पूर्ण ऐकुन घेणार मग आपले मत मांडणार...तेही अगदी खरे.. उगाच कुणाला चांगलं वाटावं म्हणून चुकीचा उपदेश देणं या माणसाला या जन्मात तरी जमणे शक्य नाही.. अशा या सोन्यासारखं ‘थोडं’ पणमौल्यवान’ बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनात मात्र प्रचंड शब्दसंपदा आहे.. त्याचा प्रत्यय तुम्हाला खाली येईल.. बघा.. या त्यांच्या लेखातील  'मंजिरी 'मध्ये तुम्हाला तुमचं कोण असं जवळचं भेटतंय.. मनातील हळवे कप्पे थोडे चाचपू या...


ओंजळीतल्या काही थेंबांची सावली  

इथं आलं म्हणजे आठवण गडद होते एवढेच..! एरवी मनामध्ये ती राहातेच. क्षणिक वगैरे नाही. मंद ज्योतीप्रमाणे तेवत राहाते. कधी भडका उडतो, कधी उन्मळून पडते ती.
मागच्या दाराला उभा राहिलो की, बांधावर उभी दिसतेस, पाटातून पाणी वाहते. त्या पाण्यात दुडूदुडू  धावत जाणारी मंजिरी... चपला न घालताच विहिरीकडे पळत जाणारी तू... काठ्यांना नकळतपणे दूर लोटीत अन् शेजारच्या वावरातील ऊस लावण्याचे आक्रीत पाहात बाभळीच्या सावलीला तू खेटली तेव्हा माझ्या बाबांचा वाढलेला आवाज. माझी घाबरलेली अवस्था. त्या अवस्थेला हसत आक्काला गळ घालणारी मंजिरी...सारं आठवतं...
मी अनेकदा या पायरीवर बसतो
या पायरीवर बसणं म्हणजेच जाणूनबुजून तुझी आठवण काढण्याचा प्रयत्न मी करतो, हे समजून आभाळातून निलगिलीच्या शेंड्यावर उतरणारी मंजिरी तेथून हसते. ती हसली की, गाईगुरांचे पोट भरणारा धास टवकारून वर पाहातो. वर त्याला काय दिसतो तो इंद्रधनुचा पसारा. साऱ्या रंगात रंगून केतकीच्या फुलासारखी पांढरीशुभ्र असलेली मंजिरी. आळोखेपिळोखे देत आकाशातल्या बगळ्यांच्या माळा मोजत बसलेली ही बया वाऱ्याच्या कोणत्याच हेलकाव्याला घाबरत नाही. तिच्याभोवती कावळ्यांची गर्दी झाली रे झाली की, मग घे ना रे कडेवर म्हणत... गडबडणारी मंजिरी... उडी मारेन हं असं म्हणून मला घाबरवणारी... मी घाबरलोय का मनातून हे डोळ्याच्या कडातून पाहाणारी...
आईची माया लावावी ती तिनेच. माझ्या पाठीवर भार होऊ नये म्हणून पारंब्या तोलवायला पुढे होणारी मंजिरी... ती पिक्चरची नायिका वगैरे मला कधीच वाटली नाही पण आनंदानं आश्चर्यानं जेव्हा ती दोन्ही शेंड्या धरून वर करायची तेव्हा 'मंगेशा, तू पोटभर जेवला म्हणजे माका देवंच पावतंया' म्हणणारी ढवळ्या केसांची आजी मला आठवायची. मंजिरी म्हणजे अशीच आजीबाई...
आताशा वारूळावरच्या झाडांवर केगायांचा कलकलाट झाला म्हणजे त्याच गोंगाटात एक सूर अजून मिळाल्यासारखा वाटतो.
ती श्रावण ओली गाणी... असं काहीसं गाणं मोठ्या सप्तकात म्हणणारी मंजिरी मारव्यावर बसूनच वारूळावर उतरते. मंजिरी लहानपणापासूनच मातीत रमणारी. त्यामुळे नात्यांचा हट्ट धरीत बसायची नाही. पाखरांचे थवे उडताना यायला लागले. हा शेजारचा कठडा मंजिरीचा आवडता सखा. तासनतास इथं ती बसायची.. समोरच्या वावराकडं टक लावून पाहायची. मंजिरी इथं बसून वाट पाहाताना अजिबात दिसली नाही. वावरातला राखेचा ढिग, तो धुरळा पाहात बसणं म्हणजे उसाच्या वावरात फिरणं नाही. हिरवळ आणि माती या दोघाचं नाते नसतं कधीच पण आभाळातून पडणारा पाऊस निमित्त घडवतो काहीतरी. मंजिरी नेहमी मातीच्या शोधात फिरायची.पाटी दप्तर वाळूवर ठेवून द्यायची. वाळूत पांढरा खडा भेटलारे भेटला की, शंभर कोहिनूर लाथळताना मंजिरी मी पाहिलीय. कावळा गागला की, त्याचे पाय सोन्याने मढवायची भाषा करावी ती फक्त मंजिरीनेच. पैलतीरावर तो ओरडला म्हणजे आत्मसमर्पणाची तयारी करायला हवी. भावभावनांची वस्त्रं जमिनीवर उतरवून ठेवायला हवी. अशी आध्यात्मिक भाषा आभाळाच्या शेंदरी रंगात साठवलीय, आभा अंथरल्यावर आपण मनमौजी होऊन फराळाचे डबे त्यावर ठेवायचे. शिळा पाव कुरतडत हवा सुंदर आहे म्हणायच्या सक्त सक्त विरोधी असणारी ही मंजिरी... रेबिनी गळ्यात अडकवून ऊन पावसाचा खेळ करणारी चानी... शितू...सई... सखी... यांना सोबतीला घेऊन गोंधळ घालणारी मंजिरी.
आता दिवसाउजेडीही मंजिरीचे येणे... विहिरीमधल्या बादलीमध्ये पाण्याचे येणे... जुने माणसं म्हणतात आडात नाही ते पोहऱ्यात कोठून येणार...
बाहेर अंधार दिसला तरी मंजिरी खूप घाबरायची. तिच्या खेळण्यांच्या दारातली माणसे दार उघडून आत घ्यायची. मग भातुकली काय... त्या पाहुण्यांची उठबस त्यांच्यासाठी तल्लत... सरबताला 'तल्लत' म्हणणारी मंजिरी डोळ्यांच्या बाहुल्यांमध्ये घिरट्या घालायला लागली की, मला वाटतं स्वप्नातून जागे होण्यापेक्षा एखाद्या घरट्यात आपलाही मुक्काम वाढवावाच. मंजिरीच्या वागण्या- बोलण्यात मवाळपणा होतातिच्या वाट्याचा आठवणींचा पाऊस ओंजळीत घेऊन मंजिरी पळत माझ्या घराकडे निघायची. पायाचा कहर... पाण्याची लहर... येथपर्यंत येऊन हाताकडे पाहायची. ओंजळीत काहीच थेंबच पाहून रूसणारी, रागावणारी मंजिरी पावसावर रूसून हशील काय, हे समजलं नाही तिला कधीच.
"संत्री मोसंबी पैशापैशाला.. शाळेतल्या मुली आल्या कशाला.. खाऊन खाऊन खोकला आला.. मामाच्या वाड्यात चोर पकडला..या गाण्यात कोण जाणे! मंजिरीचे खूप जमायचे. घोळक्याने उभे राहून हा खेळ खेळताना मंजिरीचा डबा चोरून खाणारा चोर मी असायचो. मग तो भत्ता अर्धा सांडवून द्यायचा, अर्धा बोकणे भरीत घराकडे पळत सुटायचं. मी पुढं... मंजिरी माझ्या माग... खूप दमल्यावर एकाच जागी बसायचो अन् मंजिरी अंगठा दाखवत म्हणायची - आशूड्या भत्ता तुझ्यासाठीच आणला होता. पण तो आठवड्याभरापूर्वीचा अंरें अंरे... आता परत पळापळी... जागा बदलून. सृष्टीचं शाश्वत सौंदर्य उलगडून पाहायला अन् पक्ष्यांच्या अस्मानभराऱ्या सोनेरी उन्हात भिरभिरणारी सुरवंटे पकडायला मंजिरीची बरीचशी मदत होते. मंजी... मंजी... वाक्यांना गवसणी घालायचे म्हटले तर मंजिरी त्यात गवसणार नाहीच. हे माहीत असूनही मी तिला बंदिस्त करतो पण तरीही मोकळ्या आभाळात गिरक्या घेणाऱ्या तिच्या पावलांना आणि तिच्या शब्दांना बंदिस्त करणे मला कधीच जमणार नाही, हे निर्विवाद सत्य.

 - प्रशांत भरवीरकर



23 comments:

  1. तुमच्या मनातलं जाणून आभाळातून निलगिरीच्या शेंड्यावर उतरणारी मंजिरी.. बाभळीच्या सावलीला खेटलेली मंजिरी.. तिच्या काळजीपोटी वाढलेला बाबांचा तो आवाज.. पारंब्या धरण्यासाठी धडपडणारी.. आणि जराही जाणवू न देता काळजी करणारी मंजिरी.. मनात खोलवर पक्क घर करून राहून सुद्धा उडत्या फुलपाखरासारखी हाती कधीच न आलेली मंजिरी.. तुळशीच्या डोलणाऱ्या मंजिऱ्यांइतकी पवित्र मंजिरी.. तुमच्या मनात अशीच डोकावत राहो.. आणि कुणीही न पाहिलेली ही मंजिरी मनातून तुमच्या लेखणीत उतरून सदैव सर्वांनाच भेटत राहो..

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद तुमच्या या आम्हालाही भाऊक करून जाणाऱ्या प्रतिक्रियेबद्दल....

      Delete
  2. छान स्वभावचित्र रेखाटलेय

    ReplyDelete
  3. सुरेख चित्रण.. वाचता वाचता मंजिरी डोळ्यांसमोर साकारू लागते.. अवतीभवती वावरू लागते!

    ReplyDelete
  4. सर, तुमची मंजिरी ही तुमची न राहता सर्वांचीच होऊन जाते. खूपच सुंदर व भावपूर्ण.

    ReplyDelete
  5. प्रशांत सर हा लेख खूप खूप सुंदर झाला आहे. मंजिरी ही व्यक्तिरेखा आपल्या शब्दांनी अगदी डोळ्यासमोर असल्याचा भास होतो. धन्यवाद अमोल जगताप सर हा लेख शेअर केल्याबद्दल.
    - आशिष कोकरे, नाशिक

    ReplyDelete
  6. खूपच छान ! ललित लेखनातील महत्त्वाचा लेख असा उल्लेख करता येईल
    प्रा देविदास गिरी नाशिक

    ReplyDelete
  7. सर, खूपच सुंदर सगळं, कसं डोळ्यासमोर तरळले आणि चैत्र पालवी जशी सृष्टीला बहर आणते तसे मन बहरून गेले.तुमची ही मंजिरी खूपच भावली मनाला.
    खूपच भावपूर्ण व्यक्तिरेखा.

    ReplyDelete
  8. अतिशय छान , मंजिरी चं काल्पनिक चित्र वाचताना समोर उभा राहील..

    ReplyDelete
  9. खूप सुंदर.. मंजिरी डोळ्यांसमोर तरळते💐💐

    ReplyDelete
  10. क्या बात है!
    खुपच छान हुबेहुब चित्र डोळ्यासमोर उभ राहील.

    ReplyDelete
  11. व्वा, मस्तच ��

    ReplyDelete