या जिन्स, टी-शर्ट आणि 'शायनींग' च्या जगात साधी ‘वीन’ही
न करता ज्या माणसाचा लोकांवर त्याच्या कविता, विचार आणि सर्वसाधारण राहण्यामुळे प्रचंड
प्रभाव पडतो तो म्हणजे आमचा संदीप जगताप... हा माणूस अगदी साधा... कुठेही मांडी घालून
बसणारा.. मातीशी नाळ जुळवून असलेला.. सदैव स्मित हास्य चेहऱ्यावर असणारा... त्याने
ठरवूनही..कितीही कठोर वागण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ते जमणे शक्य नाही... त्याच्या
हळव्या मनाचा प्रयत्न तुम्हाला पुढे येईलच...
प्रिय माई...
प्रिय माई,
बाहेर पाऊस पडतोय... हा पाऊस आभाळातला गं... डोळ्यातला
पाऊस तर तू मांडवाच्या बाहेर पाऊल टाकलं तेव्हापासून कोसळतोय. कोपऱ्यात जाऊन प्रत्येक
जण रडतोय. तुझा आठव आला की, वादळी पाऊस पडतोय.
तुझ्या अंगाला हळद लागल्यापासूनच आभाळ
गच्च भरलं होतं. माझ्यापेक्षा वयानं दोन वर्षे लहान असणारी माझी माई घरातून निघून गेली.
परक्या घरातली चूल झाली. कोणाची तरी सून झाली. खरंच वाटत नाही गं... आता हे शब्द कागदावर
उतरवतोय, तरी असं वाटतं तू येशील म्हणशील,” दादा, चहा देऊ?” किंवा कमीत कमी विचारशील,
“दादा, तुझा आज कोणता ड्रेस धुवायचा?” पण नाही गं. गॅसवरचा चहा आता पातेल्यातच आटून
जाईल आणि माझा एखादा ड्रेस धुण्यावाचून फाटून जाईल; पण तू येणार नाही.
कसं विचित्रच असतं नाही? हे बहीण-भावाचं जगणं. बापाच्या
मायेत आणि आईच्या छायेतच आपणाला छोटी-मोठी पंख फुटतात. नव्या पंखाच्या आनंदात आपण अंगणातल्या
मातीत लोळतो... दगडामातीचे भांडे करून संसाराचा खेळ खेळतो. किती वेळेस आपली भांडणं
सोडवताना आईच्या नाकीनऊ यायचे. तुझ्याशी भांडलो म्हणून मला वडिलांचे टोले बसायचे.
“तुझ्या-माझ्या
भांडणात, आई येई मेटाकुटी....
आता कोणाशी गं
भांडू ,झाल्या साऱ्या ताटातुटी..?”
खरंच तुटतात का गं अशी नाती? आणि एवढ्या लवकर जळतात
का रक्तातल्या वाती? हे घर खरंच तुला परकं झालंय का? कसं होईल हे घर तुला परकं? कारण
या घराच्या विटा तूच वाहिल्याय. हे घर तू उभं केलंय. या घराच्या एका भिंतीवर तुझं नाव
आहे. एक वेळेस हे वाळू सिमेंटचं घर पडेल पण आईबापाच्या हृदयातलं घर... त्यामध्ये तुला
माझ्यापेक्षाही जास्त जागा आहे.
तुझ्या लग्नातलं मंगलाष्टक चालू असतानाचा क्षण... मी
जगलेल्या आयुष्यातला सगळ्यात विचित्र क्षण होता. तुला नवं घर मिळाल्याचा पराकोटीचा
आनंद, तर इकडच्या घराच्या रितेपणाचं बोचरं दुख याच मिश्रण एकाच वेळेस अनुभवलं. डोळ्यातली
आसवं सुखाची की दुःखाची तेच कळलं नाही. तू घरातून निघून गेल्यापासून हे घर सुनंसुनंच
झालंय. कोणीच कोणाशी जास्त बोलत नाही. सगळ्या घराला
मरगळ आली. तुझ्या लग्नानंतर मी तर घरात फक्त जेवणापुरताच यायचो. झोपायलासुध्दा अंगणातच.
घरात यावंसं वाटतच नव्हतं. परतमुळाच्या दिवशी तू येणार या आशेवर घरात आनंदाचे वादळ
उठायचे.
आईची स्वयंपाकघरात आवरासावर... वडिलांची आतल्या आत तळमळ... लहानग्या ज्योतीचे
डोळे रस्त्यावर...सगळं घर कसं चाकोरासारखं व्याकुळच होऊन जातं. तुला घर छानच मिळालंय.
कुठल्या तरी पुण्याईने अशी माणसं मिळतात... असं घर मिळतं... आईसारखी सासू आणि वडिलांसारखाचा
प्रेमळ सासरा मिळाला. तिथं आलं की, डोळ्यांची पारणं फिटतात. यापेक्षा घर आणि प्रेम
हे वेगळं काय असतं. इथल्या आणि तिथल्या घरांच्या नात्यांची तू चूल झाली आहेस. हा पूल
तसा भक्कमच; पण तरीही सुरूंग न लागू देणं हे तुझ्याच हातात. ‘नवी माणसं जोडता येतात;
पण तुटलेली माणसं जोडणं अवघडच! म्हणूनच जवळची माणसं तुटणार नाही एवढंच जपायचं.’ हे
आपणास आईनं शिकवलंय...वडिलांनी आपल्या गळ्यात उतरवलंय; पण पुन्हा आठवण म्हणून सांगतो.
तुझ्या जाण्यानं एक घर दुखावलंय तर दुसरं सुखावलंय. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा
दिवस उगवतोच. हे मलाही कळतं. तू जरी दुसऱ्या घरी गेली तरी इथल्या प्रत्येक कणाकणात
तुझी आठवण आहे. तुझी नाळ सुध्दा याच घराशी जोडलेली आहे.
तेव्हा अधूनमधून तुझे पाऊल
या घराला लागतील, हे काही माझ्यासाठी कमी भाग्याचं नाही. फक्त एवढंच! घर कुठूलंही असो,
ते आता तुझंच आहे. म्हणूनच ते तळहातावरच्या फोडासारखं जपायचं...!!!
- संदीप जगताप








ह्र्यस्पर्शी अतिशय सुंदर
ReplyDeleteThanks Kanchan
Delete