कॉलेज ला ऍडमिशन घेतल्यापासून आजपर्यंत मह्याची अपूर्ण राहिलेली 'ख्वाईश' आज पूर्ण होणार होती. कारण मागेच त्याच्या वडिलांनी स्कूटर (मह्याच्या भाषेत 'बदक') एक्सचेंज करून मह्याला जेमतेम तोलवणारी पल्सर घेतली होती आणि आज चक्क मह्याला ती कॉलेजला घेऊन जायची परमिशनही मिळाली होती. त्यामुळे त्याची अवस्था जवळपास 'आज में उपर.. आसमा नीचे..' याच स्टेजला होती.
सकाळी कोंबडा ओरडायच्याही (मोबाईल मधला हं) आतच उठून मह्या अर्ध्या तासात तयार झाला (त्यातले पंधरा मिनिट तर गाडी पुसण्यासाठी फडकं शोधण्यातच गेले) मग चकाकणाऱ्या गाडीवर औपचारिकता म्हणून काळपट फडकं मारून तो ऐटीत बाईक वर बसला. त्याने दोन्ही आरसे सेट केले; नंतर किक मारायला म्हणून त्याने उजवा पाय उचलला तेवढ्यात उजव्या बाजूला गाडीसह त्याचा तोल ढासळला.. पण..
(पण.. तुम्ही उगाच घाबरू नका!)
'प्रसंगावधान' राखून त्याने ती 'क्रिटीकल सिचुएशन' कशीबशी हॅन्डल केली. लागलीच त्याला ऑटो स्टार्ट पर्यायाची आठवण झाली अन मोठ्या दिमाखात बटन दाबून त्याने बाईक 'स्टार्ट' केली. बाईकचा हॉर्न दाबत आणि एक्सलेटर पिळत त्याने शेजारच्यांना 'तो कॉलेजला निघालाय' याची पूर्वसूचना दिली आणि गचकन क्लच सोडत उसळलेल्या घोड्यावर स्वार झाल्यासारखा तो (कसाबसा) रोडला लागला. बसस्टॉपवर ताटकळत उभ्या असलेल्या पोरांना पाहून तो मनातच खुद्कन हसला तसेच रस्त्याने दिसलेल्या पोरींना रोखून पाहण्याचा एकही सुनहरा मौका त्याने सोडला नाही. (एका कॉलेज कन्येजवळ गाडी थांबवून लिफ्टही देऊ केली; पण.. काय झालं असेल ? तुम्हाला समजलं ना.. मग झालं तर..)
पुढे कॉलेजच्या गेटमध्ये घुसताना स्पीड कमी करूनही गिअर न बदलल्याने त्या च्या बाईकने दोन-चार गूचक्या देत कॉलेजला पहिली सलामी दिली. मह्यानेही ओळखीच्या काही नगांना (अजून हात सोडायची तेवढी सवय नसल्याने) तीस अंशाच्या कोणामध्ये मान फिरवून स्टाईलमध्ये 'मान' दिली. मग कट्ट्यावरून दिसेल अशा ठिकाणी त्याने बाईक पार्क केली व 'धूम' पिच्चर पाहून आल्यागत गर्रकन फिरुन त्याने गॉगल 'दबंग पांडेजी' सारखा अडकवला. त्याला पाहून कट्ट्यावर मात्र कलकलाट झाला.
"आईशपथ...!! मह्या चक्क बाईक वर.." - विन्या ओरडला.
"मग काय.. बाईक महेश वर येईल.." - अव्या मध्ये पडला.
"अरे, पण कधी घेतली मह्याने बाईक..?" – शिल्पाने विचारलं.
"दसऱ्याच्या एक्सचेंज ऑफेरमध्ये"
- टिम्ब टिम्ब मध्येच तडमडला (हाही याची खटारा घेऊन त्याच शोरूमला गेला होता; पण पाचशेच्यावर एक रुपयाही द्यायला कुणी तयार नसल्याने तो ढकलतच ती खटारा घरी घेऊन आला, हे वेगळं सांगायला नकोच.)
"तो बघा तो मह्या, कसा बाईकच्या आरश्यात बघून केसं 'सेट' करतोय. जसे काय आजच त्याला केस फुटलेत."
- श्रीक्या एकदम इवळला.
"पण तू कशाला मह्यावर जळतोस?" - शोभाही तेवढ्याच आवाजात खेकसली.
"मी... मी कशाला जळू? अगं, पुढच्या महिन्यात मीही बाईक घेणार
आहे म्हटलं."
"अरे! मागच्या वर्षापासून तू असंच म्हणतोय; पण तुझा 'पुढचा महिना' काही उगवत नाही."
"हे बघ! जोपर्यंत स्वत:च्या पैशांनी पेट्रोल टाकता येत नाही तोपर्यंत गाडी चालवण्यात काय मजा."
श्रीक्याने 'सोच-विचार’ करून नेमकं म्हणणं मांडलं.
"अंय,,उलट तोपर्यंतच तर खरी मजा असते यार..!"-
पव्याने आपला अनुभव अधिक विचार स्पष्ट्पणे नोंदवला.
तेवढ्यात बोटाने चावी फिरवत मह्या कट्ट्याकडे आला व वळून गाडीकडे नजर टाकत म्हणाला,
"आज एवढी कोणती गंभीर चर्चा चाललीय?"
लगेच इकडे शामला चेव आला अन् आता मह्याची विकेट घ्यायची असं ठरवून स्टार्ट झाला.
"हे.. हे आपलं पेट्रोलच्या भावाबद्दल बोलत होतो रे. गोडतेलापेक्षा पेट्रोल जास्त महागलंय... आमच्या शेजारच्यांनी त्यामुळेच तर गाडी कव्हरखाली झाकूनच ठेवलीय अन् सायकल रिपेअर करून घेतलीय. आता जिमखान्यापासून दवाखान्यापर्यंत ते सायकलवरच दिसतात."
हे ऐकून मह्याचा चेहरा एकदम उतरला. मग आता मयुरेश शांत थोडीच बसणार. तोही मध्ये पडला. "हो ना... पण तरीही लोकांचा गाड्या घेण्याचा दणका कमी थोडाच झालाय... गोडतेल परवडत नाही असं ओरडत... दणादण पेट्रोल टाकून फिरतात. काही नमुने तर महागातलं 'स्पीड', 'पावर' पेट्रोल टाकून अॅव्हरेज वाढल्याच्या भप्पाऱ्याही मारतात... आणि हो त्यातल्या त्यात गाडी चोरणाऱ्यांनी तर रेकॉर्डच केलाय. कालच चोरांनी माझ्या काकांची टू व्हिलर अवघ्या पाच मिनिटात पार्किंगमधून पळवली." ('चोर' हा शब्द ऐकूनच मह्यालाही कॉलनीत चोरी करताना पकडलेला चोर आठवला व आपली 'हवा' करायला म्हणून त्याच्या मित्रांनी चोराला आडवेतिडवे दिलेले टोलेही आठवले.. त्यातला एक चुकून मह्यालाही बसला होता. ) मह्या विचारांच्या वादळात गुरफटलेला असतानाच इकडे शेऱ्याने त्याचं पोथीपुराण चालू केलं. "अरे, ऐक ना... मागे आमच्या शेजारचे मामा त्यांची सायकलं चोरीला गेल्यांची कंम्पलेंट करायला पोलिस स्टेशनला गेले अन् बाहेर येऊन पाहातात तर... गाडीही गायब..!”
"मग रे?" मह्या ने गाडीकडे नजर टाकून छातीतली धडधड जरा कमी करत विचारलं.
"मग काय? कामात काम म्हणून गाडी हरवल्याची कंम्पलेंटही त्यांनी लगेचच करून टाकली. तेवढाच येण्या-जाण्याचा खर्च कमी." मह्याला हे ऐकून आता घामच फुटला व घाम पुसता पुसता त्याने पुन्हा एकदा किरमिऱ्या डोळ्यांनी बाईक न्याहाळून घेतली.
"ए, लेक्चर सुरु होईल आता... चला लवकर", असं म्हणत स्नेहलने पोरांना कसबसं आवरलं (महत्वाचं म्हणजे मह्याला त्यांच्या तावडीतून सोडवलं). मग सगळे लेक्चरला निघाले; पण कॉलेजच्या जिन्याची पहिली पायरी चढायच्या आतच मह्याने मनातल्या मनात काहीतरी विचार केला आणि कोणालाही काहीच न सांगता पार्कींगकडे पळत सुटला. पोरांना मात्र त्याचं नक्की कारण पक्क ठाऊक होतं ते एकमेकांकडे बघत खदाखदा हसत सुटले.
इकडे मह्या मात्र बाईक सुरु करून, कॉलेज च्या गेटला सलामी देऊन विमानाच्या वेगात फरार झाला आणि थेट घराच्या पोर्चमध्ये जाऊनच त्याने ते अवजड विमान कसंबसं 'लँड' केलं. मग आईला बाइककडे 'विशेष' लक्ष द्यायला सांगून तो धावपळतच बसस्टॉपवर आला आणि कितीतरी वेळ बसची वाट पाहत ताटकळतच स्टॉपवर उभा राहिला..
- अमोल जगताप



मह्याची म्हणजे आपल्यात लपलेल्या मह्याची गोष्ट छानच
ReplyDeleteha.. ha.. rightly said..
Deleteअमोल मित्रा डोळ्यासमोर चित्र उभे करतोस.खूप छान
ReplyDeleteपुढील वाटचाली साठी शुभेच्छा
Dhanyawad.. aapal naav kalel ka?
DeleteMahesh mahanje tu navata na 😆😆😆😆
ReplyDeleteHa..ha.. asto tr majja aali asti..
DeleteNice one..
ReplyDeleteThanks
Delete