Sunday, April 12, 2020

हा पाऊसही तिच्यासारखाच...

हा पाऊसही तिच्यासारखाच...


हा तिच्यासारखाच बोलायचा तेव्हाही...
कधी बळच उद्धट नि कधी खूपच उत्कट
हळवं-हळवं बोलून मध्येच व्हायचा कुचकट
बोटावर ओढणीचे गुडाळत थर
तुझ्याशीच बोलतेय जरा बधशील का वर …

 हा तिच्यासारखाच वागायचा तेव्हाही
आळूच्या पानावरुन पळत सुटायचा.
आडरानीआडवेळी रस्त्यात भेटायचा
डोळ्यातून डोळयांसाठी करत काही खुणा
भेटायला येशील ना उद्या तू पुन्हा..??
हा तिच्यासारखाच चिडायचा तेव्हाही
मध्येच उघडून पुन्हा कडाडत
कौलांवर आदळून सारखा वाढत…
भिजलेली ओढणी रागाने पिळत 
केव्हाची उभीये तुला नाही का कळत..??
हा तिच्यासारखाच रुसायचा तेव्हाही
 काळाभोर होऊन...क्षणभरही न पडून
डोळे लागूनही रात्रभर न उघड्न
कट्टी-बट्टी करुन वरून मनसोक्त रडून
बोलू नको शब्दही...नाही तर जाईल ह सोडून..!!
हा तिच्यासारखाच हसायचा तेव्हाही
कौलांच्या लवाने ओट्यावर टपटपत
झाडांच्या पानांमध्ये लपत-छपत
पाठमोरी होऊन जाताना मागे वळत
"मी हसले तुझ्यावर तरी का नाही चिडत??"
हा तिच्यासारखाच बघायचा तेव्हाही
 डोंगरांच्या पल्याडून जरासा वाकून
मंदिराच्या कळसावरून जरासा झुकून
डोळ्यांसवे डोळे असे एकत्र रोखून
"मनातलं माझ्या तुला कळतंय का चुकून..?'
हा तिच्यासारखाच नखरे करायचा तेव्हाही
कडाकडा वाजून मध्येच गडप होऊन
तडातडा पडताना घेई उन्हात न्हाऊन
भलतीकडेच पाहत जरा बोटाने टोचून
'माळ ना रे गुलाब माझ्या वेणीत खोऊन..!'
हा तिच्यासारखाच लाजायचा तेव्हाही
मळ्यात असायचा पण गावात नसायचा
रात्रभर एकटाच बरसत असायचा
ओलीचिंब होऊन जणू दिसायची लांडोर
'असा नको बघूस, मला येवत नाही समोर !!'
हा तिच्यासारखाच खुणवायचा तेव्हाही
छतावर आदळून पुन्हा भिंतीने ओघळायचा
खिडकीवर तिरपा बरसत बाहेर बोलवायचा
मिची-मिची डोळे करत गुणगुणत काही
"दारापुढून गेले तरी तुला कळाले कसं नाही..???'
हा तिच्यासारखाच सुनवायचा तेव्हाही
ओसाड माळरानावर एकटाच पकडून
टपाटपा...डाधडा..घ्यायचा पडून
गालातल्या गालामध्ये चढउतार करत
"कसं कधी बोलू नकोसांगून ठेवते परत...'
आणि हा माझ्यासारखाच रडतो आताही
मेघांच्या डोळ्यातून सारखा अश्रू गाळून
लकाकत्या विजेसवे हजार हुंदके देऊन
कवितेच्या वह्या तुझ्या रात्रभर चाळून
'कुठ गं गेलीस? मला एकटाच सोडून...'

11 comments:

  1. Tiche ani pavsache apratim rupkatmak varnan...

    ReplyDelete
  2. अमेलजी छान लिहीलं. हे दिर्घ काव्य म्हणता येईल का?आणि ईतकं उन असताना पावसासोबत तीची आठवण कशी अचानक?

    ReplyDelete
    Replies
    1. हा..हा.. आता लॉकडाऊन असल्यावर आठवायला पाऊसाची काय गरज.. वेळच एवढा आहे की सर्वच आठवत आपोआप.. ही विषय घेऊन लिहिलेली कविता आहे.. अनुभवातून अवतरलेली नाही...

      Delete
  3. खरच खुपच छान काव्य

    ReplyDelete
  4. Amol Rangnath Jagtap 👍👍👍👍

    ReplyDelete
  5. खूप छान, ही कविता बोलते, शब्दा शब्दातून पाझरते..
    मी स्वतःलाच २ वेळा ऐकवली.. जोरात वाचताना कवीच्या भावना जास्त आणि लवकर उमजतात...!!

    ReplyDelete