Friday, May 1, 2020

मला आवडलेलं... खास तुमच्यासाठी निवडलेलं...





कुठलंही काम असुद्या किंवा काहीही गरज पडूद्या.. हो अगदी "काहीही..".. अशावेळी आम्हा मित्रमंडळींना सर्वात आधी आठवण येते ती याची..
"थांब.. अभ्याला विचारून बघतो..!!"  असं वाक्य कधी ग्रुपमध्ये ऐकू आलं तर आधीच समजून घ्यायचं कि - "काम झालंच..!!"
असा हा आमचा अभ्या.. उर्फ अभिषेक निकम.. पक्का ऑलराऊंडर..!! आता हेच बघा ना.. ‘आय. टी.’ सेक्टरशी निगडित असूनही किती छानपणे व्यक्त होतो शब्दांतून ते...





एक उनाड दिवस


एकतर ऑफिसला जायला लेट झालो त्यात अचानक गाड़ी पंक्चर झाली. पण घाई असल्यामुळे मी पंक्चर काढण्याच्या भानगडीत न पडता बसनेच ऑफिसला जायचं ठरवलं. बसस्टॉपवर जाऊन उभा राहिलो. सकाळच्या सुमारास नऊ-साडेनऊ ची वेळ होती, हळूहळू शाळेच्या मुलांची गर्दी जमू लागली. अर्धा तास वाट बघूनही बस न मिळाल्यामुळे आज ऑफिसची कामे बाजूला ठेवून मी सुटी घेण्याचा निर्णय घेतला अन घरी निघू लागलो, पण याचवेळी समोरून बस आली अन् मी नकळत समोरच्या गर्दी बरोबर बसमध्ये चढलो. शाळकरी मुले दंगामस्ती करत, एकमेकांना चिडवत रिकाम्या जागांवर जाऊन बसली, काही तर जागा असूनही दरवाजाला लटकली आणि जणू काही शाळेचा पहिला दिवस असल्याप्रमाणे संपूर्ण उत्साह एकवटुन, आजूबाजूच्या वातावरणाशी समरूप होऊन दंगा मस्ती करू लागली. त्यांच्याकडे पाहता पाहता मी माझ्या विचारात रममाण झालो अन माझे शाळेचे दिवस आठवू लागलो.
सकाळी सकाळी आई रागाने अंथरुणाजवळ येत नाही तोवर कधी मलाही आपोआप जाग यायची नाही.. मग सगळी घाई-घाईत आवरासावर.. "अरे, तेवढं दूध तर पिऊन घे", हे आईचे शब्द कानावर पडेपर्यंत बाहेरून मित्रांच्या "अरे, उशिर झाला. ये लवकर" अशा कितीतरी हाका कानावर येत. मग काय कधी दूध पिउन तर कधी तसंच; सायकल वर टांग टाकून क्लासला धापा टाकत पोहचायचो. तिथुन तसेच शाळेत.. प्रार्थनेसाठी मैदानावर गर्दी करणे, सर्वांसोबत खड्या आवाजात राष्ट्रगीत, प्रतिज्ञा म्हणणे, हे सगळे संपले की सूचना ऐकत रांगेत जाऊन ठरलेल्या जागेवर दोन जणांच्या ऐवजी तिघांनी गर्दी करून बसणे हे म्हणजे ठरलेलेच. बालभारतीच्या पुस्तकावरील पुलपाखराचे रोजप्रमाणे परत एकदा दर्शन घेत अभ्यासाला सुरुवात करणे, मित्रांशी गप्पा मारणे, शिक्षा झाली की बाकावर कान धरून उभे राहणे - उभे राहता राहता शेजारच्याला चिमटा काढणे. नव्या वहीचा वास घेत आनंदाने अभ्यासाला सुरुवात करणे, चित्रकलेच्या तासाला रंगरंगोटीची मजा लुटत मुक्तहस्त चित्र काढणे किंवा एखादया देखाव्याच्या मदतीने स्मरणचित्र पूर्ण करणे, सायंकाळी कितीही दमलेले असलो तरीही, खेळत बागड़त घरी येणे, गृहपाठ पूर्ण करून झोपी जाणे.. किती साधी ती दिनचर्या.. तरीही किती आनंददायी...!!!
एकामागे एक इतक्या आठवणी मनात गर्दी करू लागल्या की माझे डोळे आपोआप ओले झाल्यावाचून राहिले नाहीत. कसलाही स्वार्थ न बाळगता, अत्यंत स्वच्छंदपणे जगलेले हे शालेय जीवन इतके काही देउन जाते की नंतर आयुष्यभर या दिवसांमध्ये जगलेले जीवन आठवत राहते आपल्याला. एखाद्या मित्राला उगाचच एखाद्या मुलीच्या नावावरून चिडवने, ती दिसली की जोरात त्याला हाक मारणे, तो चिडला की दूर धावत जाणे... अशा खूप गोष्टी मनात गर्दी करू लागल्या..
त्या दिवशी मी बसमधे माझ्या शाळेपर्यत गेलो. माझ्या शाळेचे  नाव मराठा हायस्कूल, शहरातील भरवस्तीतल्या गंगापूर रोडवर असलेले; इंग्रजांच्या काळातील दगडी इमारतीमध्ये थाटात विराजमान असलेले.. मराठा हायस्कूल...!!!
 शालेय जीवनात लागलेली शिस्त माणूस कधी विसरत नाही. तिथल्या गुरुजनांशी मन जितके एकरूप होते, तसे नंतर कधी जीवनात होत नाही, शाळेत मिळालेले मित्र माणूस कधी विसरत नाही, उलट त्यांच्याबद्दल सांगतांना अभिमान वाटतो, “हा माझा शाळेतला मित्र आहे...!!”
या विचारांमध्येच रममाण असतांना मी त्या दिवशी शाळेतच पारावर जाऊन बसलो. छान, शालेय जीवन जगत... मधल्या सुट्टीत  तिथेच मुलांबरोबर गप्पा मारत डबा खाल्ला, पाणपोईवर रांगेत उभे राहून पाणी पिले, पेरू वाल्या माऊशी कडून पेरू घेऊन खाल्ला.. हो..हो..मीठ-मसाला टाकून... नंतर मैदानात खेळाच्या तासासाठी आलेल्या बालमित्रांबरोबर लंगडी-पळी खेळत संपूर्ण शाळेची सैर केली. संध्याकाळी शाळा सुटली त्या वेळेला घरी निघालो.
त्या दिवशी माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. चुकुन का असेना, पण एका दिवसासाठी तरी, मी पून्हा शालेय जीवन जगलो असे वाटले.. आयुष्यात धावपळीत आपण कुठल्या कुठे निघून जातो, पण काही आठवणी आपल्याला कायम त्यांच्यासोबत बांधून ठेवतात. मित्रांनो, एक दिवस असे जगून बघा आणि काय वाटते ते अनुभवा. खूप टप्पे येतात आयुष्यात, पण शालेय जीवन हे अविस्मरणीय असते.. आजकाल फेसबुक आणि व्हाट्सअप् ग्रुप यांनी परत शालेय मित्रांना जवळ आणले साहे. त्या सर्व भावनांना उजाळा देण्याची बरीच सोय या पोर्टल्सनी केली आहे; ही भाग्याचीच गोष्ट म्हणावी लागेल. खूप अनुभव घेतले.. काही येतील अजुन पुढे.. खूप प्रकारचे लोकंही भेटले.. खूप ठिकाणी फिरायला, तिथल्यानुसार जगायला मिळालं... पण आजपर्यंत माझ्या आठवणीत घर करून राहिले ते फक्त माझ्या शालेय जीवनातील दिवस आणि तिथल्या गोड आठवणी...!!
पण आता.. शाळा सुटली... पाटी फुटली...
-  अभिषेक निकम 




3 comments: