मागे ऐश्वर्य पाटेकर चे "जु" पुस्तक वाचले..
ऐश्वर्य..काय बोलू नक्की त्याबद्दल.. म्हणजे.. मला तुझं पुस्तक वाचत असताना, वाचून झाल्यावर
अन आता पुन्हा ते आठवताना, जे वाटत होतं.. वाटतंय.. ते अगदी तसंच्या तसं शब्दात का
मांडता येत नाहीये! त्याबद्दल स्वत:चा राग येतोय खरा.. जे अनुभवलं ते किती जिवंतपणाने
लिहिलंय तू.. अरे, मामाच्या घरापर्यंत पायपीट करताना.. आईच्या कडेवर नक्की कोण होतं..तू..का
मी..? की मग पुस्तक वाचणारा प्रत्येक जण? किती हा जिवंतपणा.. पमीच्या पायात काटा रुतला
पण इकडे माझा पाय का हुळहुळायला लागला राव..
भावड्या.. म्हणजे तू, आई, माई, आक्का, तावडी, पमी
तुमची सर्वांची झुंज मी वाचली नाहीतर मी स्वत: ती झुंज जगलो.. लढलो.. असं वाटतंय.. मी
तिथेच तर होतो.. तुझ्याच पाटेगावात.. गण्या, झिंग्या, दिवड्या, पग्या आणि मी अम्या.. तुला
कोयी-कोयी खेळायला बोलवायचो बघ..! तुझ्या सोबतच तर होतो मागच्या बेंचवर.. जेव्हा पवार
गुरुजी तझ्या कविता वाचून तुला म्हणाले होते, “एवढ्या छान कविता तू कसा लिहू शकशील.
तू या कशावरून तरी लिहिल्या आहेत!” तेव्हाच ओरडून सांगायचं होतं मला..”गुरुजी अहो,
यानेच लिहिल्यात त्या..आईशपथ! भावड्यानेच लिहिल्या त्या!” पण ओरडताच आलं नाही नं राव.. आवाजच
निघेना गळ्यातून.. स्वप्नात होतं अगदी तसं झालं.. जीव रस्ताळला जातो, तरीही तोंडातून
शब्द फुटत नाही.. जीव तोडून पळावसं वाटतं पण जागचा हलता येत नाही; तसं.. स्वप्नासारखं.. का
मग स्वप्नच होतं हेही तुझ्या शब्दांनी दाखवलेलं..! खरंच जादू आहे तुझ्या शब्दांत.. जणू
लहानचं मोठं केलं त्यांनी मला तुझ्यासोबत.. फिरवून आणलं पाटेगाव, दिघवद, लासलगाव, चांदवड,
देवळा.. बाजरीचं वावरही त्यांनीच दाखवलं.. कुळीथाची जिलेबी खाऊ घातली अन दारुड्या बापाचं
भेवही यांनीच घातलं..
ऐश्वर्य खरंच शब्दांचं अफाट ‘ऐश्वर्य’ आहे तुझ्याकडे.. पण
माझ्याकडे नाही.. म्हणून तर ‘जू’बद्दल जे बोलायचं होतं ते एक्झाटली सांगता येत नाहीये
मला.. म्हणजे तू म्हणाला तसं झालंय बघ माझं.. मेंदूतून आरपार.. अस्वस्थतेची संततधार..!
आज याच 'ऐश्वर्यवंताचा' अनुभव खास तुम्हा सर्वांसाठी...
[ नव्या पिढीतील काहींना कदाचित यातील काही शब्द चुकीचे लिहिले गेलेत (त्यांच्या भाषेत 'स्पेल्लिंग मिस्टेक') असंही वाटण्याची दाट शक्यता आहे..त्यांनी कृपया आपल्या वडिलधार्यांकडून
ते समजून घ्यावेत.. ]
मेढ
ताई म्हनायची, “काठुटीला वायीट वाटत असल. आपून भाकरी करायचं सोडून पानी साठून ठिवतोय आपल्यात!”
“ तुहं डोस्क” असं म्हणत आईनं तिच्या पाठीत धपाटा मारला.
“मनचंदी कुडची! जा बाहेरल्या गवऱ्या आण. भिजल्यातं चूलं पेटनार नायी”
पमीला मातुर एकच काम. भांड्यामागून भांडं पान्यानं भरलं की पानी बाहेर फेकून द्यायाचं. तोंडावर येनाऱ्या झिपऱ्या पक्क्या बांधून ती तिचं काम मन लावून करत व्हती. जनू देवान तिला याच कामासाठी निर्माण केलंय. घरातला आख्खा पाऊस उपसून टाकण्याची जशी काय तिनं शप्पथ घेतलेली.
असा दाराचा पाऊस आमच्या घरभर. घरच म्हनावं का त्याला! खरंतर बैलाचा गोठा. हा गोठा रहयाला देऊन माया आज्जीनं तिच्या सुनंवर आण नातवंडावर मेहरबानी केलेली. या गोठ्यात शेणामुताचा वास भित्ताडा भित्ताडात मुरलेला. तसाच आमच्या साऱ्यांच्या जिंदगानीला. जिंदगानीलाबी तोच वास. निघता निघत नौता. आताशा तो वासही आता सरावाचा झालेला. आंगवळणी पडलेला, अक्का म्हनायची’ ”म्या जर गाय अस्तेना तर लई बरं झालं अस्त. आयता-मायता चारा खायचा. गव्हाणीत पानी आणलंका प्यायाचं. कशाचीही काळजी नायी. कुनाच्या कामाला जानं नको का कुनाचे बोलणे खाणं नको. बारामळे पूजावे लागतात. जीव नकोसा नकोसा व्हतो.”
अक्कापक्षा लान भैन तायी लई इनोदी. ती म्हनायची, “तू गाय नायी. लुबरी शेळी पाहिजेल व्हती.”
अक्का चिडायची. चिडून म्हनायच,.” अन तूगं! तू मारकी म्हैस”
“तुचय जाफराबादी काळी म्हैस”
दोघींची जुंपायची. झिट्या धराधरी, यानं काम भागनं झालं की घरात साचलेला गाळ यकमेकीच्या अंगावर फेकायच्या. कोंबड्याची झुंज लागावी तशा दोघी झुंजायच्या. आयीच्या चार-दोन फटक्यांनी अन् शिव्यांनी त्या जागेवर यायच्या.
“खाऊन सोकवल्या मादवनी काम्हून झुंजतात गं कोंबडीवानी”
घरभर पानीच पानी म्या तायी अन् पमी उपसायचो पानी पन साचतच जायचं. पुन्हा पुन्हा. थोडंसुदीक कमी व्हायचं नायी. भरीला भर आभट गडगडायचं. इजा कडकडायच्या. पावसाची अवकाळी रात. पमी घाबरून जायची. म्याही भ्यायचो. भितऱ्य्या सश्याचे व्हायचो. अक्का धिराची आमचे कान येऊन दाबायची.
यकायकी काहीतरी धपकन पडल्याचा आवाज “मेल्या मुडद्यानो, भिताड ढसाळलंय जनू”
“व्हय आयी, भगदाड पडलंय” पमी.
घरालाच शेज लाग्लाय. सारं घरच पडून जायील की काय ? घर पडलं त् भल्या दुनियेत जायचं कुडं ? राह्यचं कुडं ? उघडे पडू साऱ्याच बाजूनी. आधीच उघडं आयुष्यः त्यात घर पडलं त ? भीतीनं पोटात गोळा
उभा राह्यला. ढासळलेल्या भिताडातून सळंगधार कोसळणारा पाऊस दिसू लागला. इजेचा गप्पकन
उजेड घरात येऊ लागला. वादळाला तोंड फुटलं. ते भगदाडातून जिभल्या दावू लागलं.
"पाऊस बघ कसा सळगधार कोसळतोय !" तायी म्हणली.
" तुहं मढ बसवलं तुहं ! कुडचा
सळंगधार पाऊस
घेऊन बस्लीस गं मादवनी इडं घर कोसळतंय त्याचं कायी नायी.”
“ माझ्या अंगावर तोलू व्हय. पडलं त् पडलं.”
ताईनं आयीला उध्दट उत्तर दिल्यामुळे आयीनं तिच्या वल्ल्या हाताची चापट ठेवून दिली. तायी बोलाया अग्गव तिला सनच व्हायचा नायी कुनाचा बोल. ती कुनालाबी फिरून बोलायची. तीला लान ना मोठं कायीचं कळायचं नायी. घरभर पान्याचा राडा. वरनं अस्ल्या कुरबुरी. पावसाची जोरकस सर यावी तश्या मधेच येऊन जात व्हत्या. शांत व्हत व्हत्या.
अचानक घराची मेढ मोडल्याचा कडाडऽऽ आवाज झाला. आयीनं अंगावर रेलून येनारंपाखं वरच्यावर तिच्या दोन हातांनी तोललं.
“पळा नानाच्या घरी जा!”
“आमी नायी जानार” अक्का.
“ आगं मरशील!”
“ तुला यकटीला मराया सोडून जाऊ व्हय!” अक्का.
अक्काच्या मताशी यकमत व्हत आमी सारेच आडून बस्लो. आयीला संकटात सोडून जायाला आमी तयार नव्हतो. आयी जायला सांगत व्हती. आमी मोंडू पहानाऱ्या घराची सोबत कराया थांबून राह्यलो.. कुष्नानं गोवर्धन परवत करंगळीवर तोलून धरला. तसा आयीने कोसळनाऱ्या पाख्याला तोलून धरलं. आयी कुष्न झाली. आयी मेढ झाली.
अक्का बी पानी उपसायला बिलगली. म्या बी. पमी बी. ताई बी. अख्खी रात डोक्यावर घेत आमीत्या पावसाशी झुंजतोय. तो आमच्याशी. अशी न्यारीच झुंज. घरात गुडघाभर गाळ.. गाळात रूतून आमचं जिणं. गाळ-गाळ. आणखी रुतत, आणखी रुतत. चिखल चिखल झालं!
“पोरांनो माला काही कळ सोसवना, तुमी आपला जीव वाचवा, कुडे आसऱ्याला पळा।“
“कुडं पळनार”
“ कुडंही जा. म्या कायी मरत नायी”
“आयी. म्या तायीच्या खांद्यावं बसून तुला मदत कर्ते पोखं तोलाया.” पमी म्हनाली.
पनी तायीच्या खांद्यावर बस्ली. रेटा देऊ लागली. पाख्याला आंगावं रेलून येणारं संकट तिनं तिच्या पिन्हुल्या हातानी लाऊन धरलं. आता कसं पाखं पडते बघते म्या. म्या हाये आनि ते हाये. या जोश्यात पमी. झाशीच्या रानीगत. आयी, पमी, तायी साऱ्या यकाच कामात गुंतल्या. मी आनि अक्का उरलो. अक्का नेटानं उपसू लागली गाळ. गाळच गाळ. तो कायी केल्या संपेना. अक्का झपाटल्यागत उपसेय गाळ..
वादळाच्या जोरानं कुडाचा दरवाजा तुटून पडला. आधी भित्ताड. मंग मेढ, अन् आता दरवाजा यक यक करत. घराचे आवयव गळून पडू लागले.. आमी त्याच्ये आवयव व्हऊन त्याला शाबूत ठिवन्यासाठी झटू लागलो.
म्या हळचकन दरवाजाच्या बाह्यर डोकं काढलं. गारायचा पटारा पडलेला. समदीकडं गाराच गाराच इजेच्या उजेडात चमकल्या. म्या यचल्या चारदोन गारा, खूप मोठं धन हातात घेऊन म्या घरात आलो. इरघळून जानारं ते धन आयीला दावत म्हन्लो, “आयवं गारा बघना कश्यायत!”
यक गार तोंडात टाकली. लयी थंडगार. साऱ्या हाताना ठणक. मधल्यामधी घोळत. गार दाताखाली घेत कडम कडम खाल्ली. निचळ चव!
“ये आयी बघना जल्दी. इरघळून जाईन”
“आरं हात अडकलेत माहे. सोडले त् घर आंगावर येईन”
“ कायीनायी येनार बघतर खरं!” मी हट्टाला पेटलो. आयी कायी दाद देईना. खुप मोठे गुपित दृष्टीआड व्हईन म्हनून हळहळलो.
“पमे, पमे तू घे”
पमी यक नंबरची खादाड, खायचं म्हनलं की पमी कायीबी कराया तयार पमीनं झटक्यानं पाख्याचे हात सोडून. “बघू दे”
म्या तिच्या हाताव गार ठिवली. तायीला राग आला. तीन पमीला धप्पकन सोडून दिलं. पमी भुईवर आदळली. तिनं भोकाड पसरलं.
“आँ! माही मान किती दुखली ढम्मी कुडली, इडं माहा जीव जातोय, बायी मस्त गारा खातेय, माह्या खांद्यावं बसून.”
पाऊस थांबला तव्हा पहाट झाली व्हती. वल्ली किच्च पहाट. आयीच्या हाताला मरनाच्या कळा लागून आल्या. आयीनं पाखं सोडलं. पन ते पडलच नायी. आयी रातभर अवघडून उभी व्हती. मेढीसारखी मेढ व्हऊन. चिखलात पाय रोऊन. जागची हाल्ली नायी की चालली नायी. लेकराचा जीव वाचावा म्हनून...
अक्कानं वल्ली चूल पेटवली. वल्ली गवरी धुपत व्हती. अक्कानं फुकणीनं फुकत फुकत जाळ केला. गवती ‘च्या’ उकळवला. आमी गोणपाट टोकून बस्लो. ‘च्या’ पेलो.
‘च्या’ पेऊन तरतरी आली. पुन्हा नव्या पावसाशी झुंजायासाठी. मोडून येणारं घर तोलून धरण्यासाठी. फाटत जाणारं आभाळ टाका टाका घालून सांधण्यासाठी... भित्ताडाचं भगदाड लिपन्यासाठी... घराची मेढ व्हन्यासाठी...
- ऐश्वर्य पाटेकर







बापरे ....!!!निसर्ग एखाद्यावर मेहेरबान झाला तर तो सारच काही घेवून जातो... आणि त्याचीशी झुंज देण्याची मात्र आपली कसोटी लागलेली असते...
ReplyDeleteखूप गंभीर पाऊस दावला तुम्ही... फार छान वाटल.. ( मयुर श. गांगुर्डे)