उन्हाळ्यातील आठवण
सखे,
खरं सांगू लेखणी हातात घेतली की, माझं मन फक्त तुझ्याच विचारांनी भारावून जातं! गेल्या कित्येक दिवसांचा हाच अनुभव घेत मी प्रत्येक क्षण जगतोय! अन् सध्याच्या रणरणत्या उन्हात जर तुझी आठवण आली नाही तर नवलच! गेल्या बऱ्याच दिवसांपासून आपल्या भेटीचा दुर्मिळ योग काही आला नाही. म्हणजे तुझ्याशी डायरेक्ट बोलण्याचा प्रश्नच नाही म्हणून हा लेख प्रपंच!
या भर उन्हात तुझी आठवण म्हणजे माझ्यासाठी जणू काही थंड पाण्याचा शिडकावाच! आंब्याच्या भरगच्च मोहोराआडून कोकीळ त्याच्या प्रेयसीला साद घालतोय अन् तुझ्या आठवणींचा वसंत मात्र माझ्या मनातच बहरतोय!
तशीही तू भलतीच हट्टी, अल्लड अन् खोड़कर ! उन्हाला मात्र प्रचंड घाबरणारी! अन् मी त्याच उन्हात फुललेल्या गर्द लाल-जांभळ्या गुलमोहोराच्या सावलीत उभा राहून तुझी वाट पाहतोय! गुलमोहर हा तसा नित्याचाच. पण भर उन्हाळ्यातला गुलमोहर हा निराळाच!
अंगाची काहिली करणाऱ्या वैशाखवणव्यात प्रेमीजीवांना सुखावणारा हा गुलमोहर म्हणजे दुर्दम्य आशावादाचे प्रतिकच जणू! त्याच्याच तर साक्षीनं आपली पहिली भेट झाली होती... आठवतंय (?)
पण... मला सारं आठवतंय! तुझं ते हसणं, रागावणं, रूसणं अन् वर सॉरी म्हणत माझ्याकडूनच स्वतःला माफही करून घेणं! तुझ्या गालावरची खळी म्हणजे जणू ' मृगजळच ' ! तुझ्या बोलक्या डोळ्यांशी तुझ्याही नकळत मी किती गप्पा मारल्या ते फक्त मलाच ठाऊक! पण.... आता ते सर्व दुर्मिळ झालंय... उन्हात वाहणाऱ्या थंडगार वाऱ्यासारखं...! आताही भर वैशाखात आभाळ भरून आलय! मेघ दाटून आलेत अन् तुझ्या आठवणींनी माझं मन चिंब भिजून गेलंय! बस्स...! एवढंच कारण पुरेसं होतं तुला लिहायला बसायला. तुझ्या आठवणींच्या सरींनी चिंब भिजूनसुद्धा पापण्यांतील पाणी काही वाहून जात नाहीये. माझ्या अणूंची ही एक किनार मात्र तुझ्या आठवणींना नेहमीची लागलेली... तुझी आठवण म्हणजे जणू काही प्राजक्तांच्या फुलांची उधळणच! प्राजक्ताची फुल हातात घेऊन उधळली, तरी त्यांचा सुगंध मात्र हाताला दीर्घकाळ येत राहतो. अगदी अस्सच आहे तुझ्या आठवणींचं!
दुपारच्या रणरणत्याउन्हात थकलेलं शरीर अन् मन हे उदास असतं तेव्हा तुझी आठवण ही थंडगार हवेच्या झुळुकीसारखीच वाटते अन् क्षणात सारा थकवा निघून जातो. अचानक शरीर उत्साहानं भरून जातं. मला वाटतं, प्रत्येकाच्याच मनाची हीच अवस्था असेल बहुतेक.... संध्याकाळच्या 'उतरत्या' उन्हात तुझ्या आठवणीनं मन कावावीस होतं अन् तू सोबत असल्याचं 'मृगजळ' हळूहळू नष्ट होत चालतं अन् अलगद ओठांवर शब्द सुचतात...
"आज तू सोबत नाहीस आठवणी मात्र जपल्या आहेत..
तुझ्या आठवणी म्हणजे... माझ्या जखमेवरच्या खपल्या आहेत..!!"
- भूषण र. जाजू






खूप छान सर... भर उन्हात पुन्हा एकदा तुमच्या अक्षरांनी मनावर थंडगार फुंकर मारली आहे...
ReplyDeleteहा थंडावा असाच उन्हाळा भर तुमच्या लेखणीतून अंगावर शिंपडत रहो हीच सदिच्छा...