Saturday, May 23, 2020

मला आवडलेलं... खास तुमच्यासाठी निवडलेलं...




प्रेम किती समंजस, संयमी असावं याचं भान देणाऱ्या ‘ वेदना सातारकर..? हजर सर..’. या कवी प्रशांत मोरे यांच्या काव्यसंग्रहाविषयी.. कवी, चित्रकार प्रा. विष्णू थोरे यांनी मांडलेले विचार.. 

वेदना सातारकर...? हजर सर..


पहिला तास. मास्तर हजेरी घेतायेत. त्याचा नं. ५२ तिचा ५४. तिचा त्याने लक्षात ठेवलाय. त्याचा तिने. कधी कधी हजेरी देताना दोघांचाही गोंधळ होतो. ती त्याची हजेरी लावते. तो तिची. तिचं नाव आलं की, ती ‘हजर सर’ म्हणते. वर्ग हसतो.

“तू ‘यस सर’ ऐवजी ‘हजर सर’ का म्हणतेस?”- मास्तर विचारतात.
‘मी रोज ज्ञानेश्वरी वाचते. एरव्ही मराठीच बोलते’ - तिचं उत्तर.
ती अशी संस्कारात वाढलेली. तो छंदी, फंदी कवी. त्याला गाण्याचं वेड. तिला त्याचा आवाज आवडतो. आवाजासोबतच ती त्याच्याही प्रेमात पडलीय. तिचं नाव वेदना.. वेदना सातारकर...
प्लॅटफॉर्मच्या कोपऱ्यात उभं राहून वेदना त्याची वाट बघते. तो नेहमी सारखाच उशिरा येतो. ती संतापाने लालबुंद होते. लोकल असो वा बस ती गर्दीत धुसून दोघांसाठी जागा धरते. वेदना सातारकर हे कवी प्रशांत मोरे यांच्या कवितेतील मुंबईच्या गर्दीत भेटलेलं व हरवलेलं एक प्रेमळ, मायाळू कॅरेक्टर आहे. तिच्या हरवण्याने तो उद्ध्वस्त होत नाही. याउलट ती जिथे असेल तिथे सुखी असावी हा उदात्त मानस आहे.

असाही एक सूर कवी प्रशांत मोरे यांनी आळवलाय. कॉलेजमधील वेगवेगळे प्रसंग कवीने अतिशय तरलतेने शब्दबध्द केले आहेत.
एका निखळ प्रेमाची शब्दानं गुंफलेली ही वीण एक एक धागा उसवत जाते. पुढे काय तगमग वाढते. कविता गुंतवत नेते, गुंतवते.

मी स्वतला बघू शकत नाही
तुझ्याशिवाय जगू शकत नाही
तुझं काय ते सांग अथवा
सांगू नकोस
नजरेसमोर राहा सतत
जत्रेसारखा पांगू नकोस!

प्रेयसीची प्रियकराविषयीची ओढ, तगमग, तो समोर असावा म्हणून तिचा आर्जव, व्याकुळता सगळं काही आपल्यासारखं.
कवितेतला नायक कवी आहे. कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमात तो नेहमी अग्रेसर.
ती त्याचं कौतुक करते. रूमालात जपून ठेवलेलं ‘बिस्किट’ त्याला देते. मग मुली तिला चिडवतात. चिडवणाऱ्या मुली तिला आवडतात. लीना नावाची एक मुलगीही त्याच्यावर प्रेम करते. हे वेदनेला कळते. 'त्याला डोळे चिरून डोळ्यात भरावंसं वाटतं', असं लीना म्हणते. वेदना भांबावते, धास्तावते, अस्वस्थ होते.
परीक्षा संपते. कॉलेज बंद होतं. निकालापर्यंतचा विरह अस्वस्थ करतो. भेटीची तारीख जवळ येते आणि हजेरीच्या नंबरांसारखाच तारखेचा घोळ होतो. वेदना भेटत नाही. तो खूप शोधतो. ठाणा ते घाटकोपर, कुर्ला ते सी.एस.टी., चर्चगेट ते वसई-विरार-कर्जत ते कसारा. डोळे खिडकी होतात. सैरभैर उडू पाहतात. वेदना कुठेच दिसत नाही. तो भूतकाळ आठवत राहातो. घरटं सोडून जाणाऱ्या चिमणीकडे पाहून उदास, अस्वस्थ हसतो.
दरम्यान खूप काळ गेलाय. वर्षं गेली...
आता तो मास्तर झालाय. मुला-मुलींची रोज हजेरी घेतो. ‘५४’ नंबर येताच मान खाली घेतो. स्वतशीच पुटपुटत ‘हजर सर’ म्हणतो...

-    - विष्णू थोरे





5 comments: