...काही माणसं असतातच मुळात महत्त्वाकांक्षी.. 'काय नाहीये आपल्याकडे' हे सांगत रडत बसणे नाही पटत त्यांना.. 'पोलादी मुठी'ची ही अशी माणसे असतात वावरत आपल्याच आसपास.. जसा माझा मित्र किशोर... किशोरला मी शालेय जीवनापासून ओळखतो.. शेजारीच एका घराचं बांधकाम सुरू झालं तिथे कामासाठी एक पत्र्याच शेडं टाकून एक कुटुंब रहायला आलं.. त्या कुटुंबातला मोठा मुलगा म्हणजे किशोर.. आम्ही ग्राउंडवर क्रिकेट खेळत असताना बांधकामाच्या विटा वाहताना, भितींना पाणी मारताना तो नेहमी दिसायचा.. दिवसभर काम अन् सायंकाळी बाहेर बसून अभ्यास.. लाईटचीही सोय नव्हती नेमकी तेव्हा.. हिवाळ्यात तर अंधारही लवकर पडायचा.. त्याची पंचाईत व्हायची. मग शेजारच्या घराच्या पोर्चच्या बल्बखाली तो कित्येकदा लिहित-वाचत बसायचा.. पुढे पुढे घराचं बांधकाम आटोपलं.. दुसरं कामही मिळेना जवळपास, मग ऊस गुऱ्हाळाचा गाडा सुरू केला त्याच्या वडिलांनी.. किशोरही न लाजता गल्लीबोळातून मित्रांसमोर तो गाडा ढकलत वडिलांसोबत रस काढून विकू लागला... दिवसभर दमुनही त्याच्या रात्रीच्या अभ्यासात मात्र खंड नव्हता.. दरम्यान किशोरच्या बहिणीचं लग्न झालं.. कुटुंबाचा ‘गाडा’ वडिलांसोबत ओढत; अभ्यासाचा ‘कासरा’ही त्याने कधी हातून सुटू दिला नाही… किशोरबद्दल एक गोष्ट विशेषपणे नमूद करावीशी वाटते कि, आयुष्य एवढं खडतर सुरु असतानाही कुठल्याही व्यसनाच्या आहारी न जाता.. कुठल्याही गोष्टीसाठी कुढत न बसता तो फक्त आणि फक्त लढत गेला.. आज त्याने त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा सर केलाय.. MA, M.Phil,
SET करून तो एका 'विद्यार्थ्याचा' आता 'सर' झालाय... त्याच्या ह्या लढवय्या स्वभावाचं वर्णन करायचं झालं तर खालच्या ओळी अगदी चपखल बसतात...
व्यर्थ
हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो
मूठ
पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची !
पैज
जे घेती नभाशी आणि धडका डोंगराशी
रक्त
ज्यांचे तप्त आहे, फक्त त्यांना हक्क आहे
श्वास
येथे घ्यावयाचा ! आग पाण्या लावण्याचा
घाव
ज्यांचा भाव आहे, लोह ज्यांचा देव आहे
माती
हो विभुती जयांची, ही धरा दासी तयांची ..!!!
मला आवडलेलं.. खास तुमच्यासाठी निवडलेलं मध्ये.. आज त्याचीच कविता... तुमच्याच मनात असलेल्या 'किशोर'साठी...
माय
आणि मराठी
गुरूजी तसा मी इंग्रजीचा विद्यार्थी
पण माझी माय आणि मराठी या दोघींसाठी,
माझ्या पोटात कळ आणि मनात कळकळ आहे..
काल वर्गात शिकवलेली ‘ट्रेजडी’ आणि
मित्रांनी ग्राउंड वर केलेली ‘कॉमेडी’
असा दोन्हींचा घोटाळा डोक्यात घेऊन घरी गेलो..
तर माय माझी जात्यावर दळून गाणं गात होती
तिचं गाणं - ऐकून जणू काळजाचं पाणी झालं
दप्तराचं ओझं खाली टाकत मी तिच्याजवळ जात म्हणालो-
आई तुझ्या गाण्यानं काळजाचं पाणी झालं बघ
जात्यावरच्या पिठानं माखलेला हाथ तोंडावरनं फिरवत माय म्हणाली
तु माह्या पोटचा गोळायस म्हणून तुला सांगते, काळजातुन गायलं का काळजाला भिडतंय बघ
तु माह्या पोटचा गोळायस म्हणून पुन्हा तुला सांगते,
माणसाच्या माणुसकीला जसा काही पइलाच सुरुंग लागलांय बघ
जर का माणसाची माणुसकी शिल्लक असती तर तुक्याची गाथा इंद्रायणीच्या पाण्यात बुडवली नसती
येशुला हत्तीच्या पायाखाली चिरडलं नसतं
पोरा तु माह्या पोटचा गोळायस म्हणुन पुन्हा तुला सांगते
इंग्रजाच्या इंग्रजीतले चार पुस्तकं शिकुन साता समुद्रापल्याड गेलास तर माझ्या माय मराठीला इसरु नगंस
भावनेच्या भरात गाईलेल्या गाण्यानं आईच्या डोळ्यातुन आसवं ओघळत होती
तिच्या ओघळणाऱ्या आसवांना पुसत
मी म्हणालो आई मलाही वाटलं गं
या माय मराठीचे शहाणपण माणसांना ओरडून सांगावं.
पण शहाणपण जपणारी माणसं कुठयत..
आई मलाही वाटतं गं..
खूप खूप बोलावं.. पण बोलकी माणसं भेटत नाहीत.
तेव्हा मला जे बोलायचे ते कागदांशी बोलतो
तसेही माणसांशी बोलायचे दिस राहिले नाहीत आता..
आई, मला त्या माणसांबद्दल बोलायचे आहे ज्याच्यासाठी जन्मल्यावर बारा आणि मेल्यावर चौदा दिवसाचा इटाळ पाळला जातो..
आई मला त्या माणसाबद्दल बोलायचे आहे, जो जन्मभर जळल्यावरही त्याला मेल्यावर पण जाळलं जातं..
आई, मला त्या मातीबद्दल बोलायचे आहे
जिथे पुरलेलं नाही पण पेरलेलं उगवतंय..
माझ्या बोलण्यानं माईच्या डोळ्यांतून पुन्हा एकदा आसव ओघळली..
अन जात्यावरच्या पीठाने माखलेला हात तोंडावरनं फिरवत माय म्हणाली
‘पोरा तुझ्या ईचारांचा कळस गगनाला जावा..
म्हणून इटेवरच्या ईठठलाला साकडं घालील..’
एरव्ही दळून दळून तोंडाला फेस आल्यावर
इटेवरच्या ईठठलाला शिव्या घालणारी हीचं ती माझी माय..
माझ्या ईचारांचा कळस गगनाला जावा अन् त्याला गंध मातीचा यावा म्हणून साकडं घालू लागली..
गुरूजी अशी आहे माझी माय आणि मराठी..
म्हणून तिच्यासाठी माझ्या पोटात कळ नि मनात कळकळ आहे..
- - किशोर कुदळे




Inspiring story of Kishor,well done Jagguda keep going
ReplyDelete